Asia Cup 2023 India vs Pakistan Tickets: आशिया चषक स्पर्धेअंतर्गत श्रीलंकेमध्ये होणाऱ्या सामन्यांची तिकीटविक्री सुरु झाली आहे. पाकिस्तानमध्ये या स्पर्धेतील 4 सामने खेळवले जाणार आहेत. तर अंतिम सामन्यासहीत एकूण 9 सामने श्रीलंकेमध्ये खेळवले जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानसहीत नेपाळचा समावेश अ गटामध्ये आहे. अ गटातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना श्रीलंकेतील पेल्लेकेले स्टेडियममध्ये 2 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तिकीटांची विक्री सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये प्राइम रेटची तिकीटं संपली. 10 मिनिटांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं संपली. बरं या तिकिटांचे दर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसले.


सर्वात महागडं तिकीट कितीचं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारंपारिक प्रतीस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तानी संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरणार म्हटल्यावर दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारतो. बरं हे सामने जगात कुठेही खेळवले गेले तरी हाऊसफूल असतात. असाच काहीसा प्रकार श्रीलंकेमध्येही पहायला मिळाला. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटविक्री सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये सर्वात महागडी तिकीटं विकली गेली. या सामन्यासाठी सर्वात महागडं तिकीट हे 300 अमेरिकी डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 25 हजार रुपये इतकं आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वसामान्य व्यक्तीच्या महिन्याच्या पगाराऐवढ्या किंमतीत या सामन्याची तिकीटं विकली गेली आहेत.


किती आहे तिकीटाचा दर?


भारत-पाकिस्तान सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट हे 30 अमेरिकी डॉलर म्हणजेच अंदाजे अडीच हजार रुपये इतकं आहे. शेवटच्या रांगेतील ही तिकीटं अद्यापही विक्रीसाठी काही प्रमाणात उपलब्ध आहेत. तर व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी सॅण्डमधील सर्व तिकीटं विकली गेली आहेत. व्हीआयपी स्टॅण्डचं तिकीट जवळपास 10 हजार 500 रुपयांचं आहे. आशिया चषकाची तिकीट पाकिस्तानच्या पीसबी डॉट बुक मी डॉट पीके या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.


भारत-नेपाळ सामन्याची तिकीटंही सोल्ड आऊट


आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान 2 सप्टेंबर रोजी अ गटातील पहिला सामना होणार आहे. तर भारताचा दुसरा सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे. या सामन्यांची तिकीटविक्रीही सुरु झाली आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यातील व्ही-व्हीआयपी आणि व्हीआयपी स्टॅण्डची तिकीटं संपली आहेत. या सामन्यातील सर्वात महाग तिकीट 4200 रुपयांचं असून सर्वात स्वस्त तिकीट 850 रुपयांचं आहे. 


भारतासाठी महत्त्वाची स्पर्धा


आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश हे 6 संघ सहभागी होणार आहेत. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा असलेली आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान भरवली जाणार आहे. या स्पर्धेकडे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धे आधीची सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून पाहिलं जात आहे. भारतीय संघासाठीही ही स्पर्धा अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे.