Asia Cup 2023 : पाकिस्तानचा बांगलादेशवर `सुपर` विजय, आता गाठ टीम इंडियाशी
एशिया कप स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये यजमान पाकिस्तानने दणक्यात सुरुवात केली आहे. भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशचा सहज पराभव केला. इमाम उल हक आणि मोहम्मद रिझवानच्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने विजय मिळवला
Asiac Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत सुपर-4 सामन्यांना सुरुवात झाली आहे. सुपर फोरच्या पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानने बांगलादेशचा (Pakistan Beat Bangladesh) सात विकेटने धुव्वा उडवत दणक्यात सुरुवात केली आहे. इमाम उल हक (Imam-ul-Haq) आणि मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने चाळीसव्या षटकात विजय मिळवला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमवर बांगलादेशने पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर विजयासाठी 194 धावंचं लक्ष ठेवलं. विजयाचं हे लक्ष पाकिस्तनने 39.3 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करत सहज विजय मिळवला.
पाकिस्तानच्या विजयाचे हिरो ठरले ते इमाम उल हक आणि मोहम्मद रिझवान. इमान उल हक आणि फकार झमानने पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. पण झमान अवघ्या वीस धावा करुन बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला कर्णधार बाबर आझमही केवळ 17 धावा करुन पॅव्हेलिनमध्ये परतला. पण त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी आलेल्या मोहम्मद रिझवानने इमाम उल हकला साथ देत बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसं काढली. इमाम उल हकने 84 चेंडूत 78 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर रिझवानने अवघ्या 79 चेंडूत 63 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याने 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागिदारी केली.
बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली
त्याआधी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशचा संपूर्ण संघ 38.4 षटक्ता 193 धावांवर आटोपला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने भेदक गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजीला भगदाडा पाडलं. रौफने 6 षटकात केवळ 19 धावा देत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर नसीम शाहने तीन विकेट घेत रौफला चांगली साथ दिली. शाहिन आफ्रिदी, फहीम अशरफ आणि इफ्तिकार अहमदने प्रत्येकी एक विकेट घेतली. बांगलादेशतर्फे मुश्फिकर रहिने सर्वाधिक 64 धावा केल्या. तर कर्णधार शाकिब अल हसनने 53 धावा करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.
आता गाठ भारताशी
सुपर-4 मध्ये विजयी सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानचा आता सामना टीम इंडियाशी होणार आहे. 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान कोलंबोत आमने सामने येतील. पण या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. याआधी 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाऊस अडथळा ठरला होता. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना रंगणार असून पावसाचा विचार करून या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.