आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान अपेक्षेप्रमाणे संघ निवडीनंतर वादाला तोंड फुटलं आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये हिट असला तरी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरत आहे. पण त्यानंतरही त्याला संघात स्थान दिलं आहे. यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहे. सूर्यकुमार यादवसह दुखापतीतून सावरलेल्या के एल राहुल, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा हेदेखील संघात आहेत. दरम्यान, युजवेंद्र चहल, आर अश्विन, संजू सॅमसन यांनाही संघात जागा देण्यात आलेली नाही. यावर रोहित शर्माने प्रत्येकाचं समाधान झालं पाहिजे असं उत्तर दिलं आहे. 


'कोणासाठी दरवाजे बंद नाहीत'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बोलताना, ज्यांना संघात सहभागी करण्यात आलेलं नाही, त्या आपल्या स्टार स्पिनर्ससाठी दरवाजे अद्याप बंद झाले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आशिया कपसाठी भारतीय संघात फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना घेण्यात आलं आहे. आशिया कप संघात आऱ अश्विन, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देताना एका जलद गोलंदाजाचा बळी द्यावा लागला असता. 


भारतीय कर्णधार रोहित शर्माने पुढील दोन महिन्यांसाठी आपल्याला संघासह आठवणी तयार करायच्या आहेत असं म्हटलं आहे. आशिया कप पाकिस्तानात पार पडणार आहे. पण भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. श्रीलंकेत आशिय कप खेळल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आयसीसी वर्ल्डकप खेळण्यासाठी स्वदेशात परतणार आहे. रोहित शर्माने वर्ल्डकपसाठी संघाच्या तयारीवरही भाष्य केलं आहे. 


'राहुलभाई आणि मी पूर्ण समजावण्याचा प्रयत्न केला...'


"सर्वश्रेष्ठ संघाची निवड करताना असे अनेक खेळाडू असतात ज्यांना संधी मिळत नाही. राहुलभाई आणि मी खेळाडूंना संघात स्थान का मिळालं नाही हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा संघाची घोषणा झाली तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्याशी समोरासमोर बसून बोलतो. त्यांची निवड का झाली नाही याबद्दल प्रत्येकाशी चर्चा करतो," असं रोहित शर्माने सांगितलं आहे. 


रोहित शर्माने पुढे सांगितलं की, "कोणत्याही खेळाडूची संघात निवड करताना किंवा बाहेर काढताना व्यक्तिगत प्राथमिकता दिली जात नाही. मला एखादी व्यक्ती आवडत नाही म्हणून ड्रॉप केलं असं होत नाही. कर्णधारपद हे व्यक्तिगत पसंत, नापसंद यावर आधारित नसतं. जर एखाद्याची निवड झाली नसेल तर त्यामागे एक कारण असतं. याव्यतिरिक्त काहीही नसतं".