Asia Cup: आगरकर म्हणाला `कोहली पाकिस्तानला सांभाळून घेईल,`; शादाब खान संतापला, म्हणतो `नुसतं बोलून...`
आशिया कप (Asia Cup) सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असून सर्वांचं लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे. 2 सप्टेंबरला दोन्ही संघ भिडणार आहेत. पण त्याआधीच मैदानाबाहेर दोन्ही संघ आमने-सामने आल्याचं दिसत आहे.
सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून असलेला आशिया कप 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. आशिया कपच्या निमित्ताने क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे संघ भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. 2 सप्टेंबरला दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. पण मैदानातील प्रत्यक्ष सामना सुरु होण्याआधीच दोन्ही संघ आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. याचं कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा मुख्य निवडकर्ता (BCCI chief selector) अजित आगरकरने केलेलं एक विधान ठरत आहे. या विधानावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने उत्तर दिलं आहे.
अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत आशिया कपच्या संघाची घोषणा केली होती. यादरम्यान अजित आगरकरलला पाकिस्तान क्रिकेट संघासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अजित आगरकरने विराट कोहली सांभाळून घेईल असं उत्तर दिलं होतं. त्यासंबंधी शादाब खानला विचारण्यात आलं असता, त्याने सामन्याआधी आपण काय बोलतो याला महत्त्व नसतं असं उत्तर दिलं आहे.
पाकिस्तानचे गोलंदाज जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी आहेत. त्यामुळे अजित आगरकरला, पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना कशाप्रकारे केला जाईल असं विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना अजित आगरकरने म्हटलं होतं की "विराट कोहली त्यांना सांभाळून घेईल". यावर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने म्हटलं आहे की "तुम्ही मैदानात काय करता हे जास्त महत्त्वाचं असतं. सामना संपल्यानंतर किंवा त्याच्या आधी काय बोलता याला महत्त्व नाही".
2022 च्या टी-20 वर्ल्डकपधील सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात जबरदस्त खेळी केली होती. विराट कोहलीने एकट्याने भारताला हा सामना जिंकवत पाकिस्तानच्या तोंडचा घास हिरावला होता. आशिया कपमध्ये विराट कोहली संघासाठी पुन्हा अशीच कामगिरी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. पण शादाबने सामना होईल, तेव्हाच नेमकं काय होईल ते दिसेल असं म्हटलं आहे.
"हे पाहा, त्या दिवशी नेमकं काय होतं त्यावर ते अवलंबून असतं. मी किंवा इतक कोणीही, किंवा त्यांच्याकडचं कोणी काही म्हटलं तरी फक्त बोलण्याने काही होत नाही. फक्त बोलण्याने गोष्टी बदलत नाहीत. जेव्हा सामना होईल, त्यात ज्या गोष्टी दिसतील, त्याच खऱ्या गोष्टी असतात," असं शादाबाने पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं.
अफगाणिस्तानविरोधात 3-0 अशी मालिका जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाचा शादाब हा प्रमुख खेळाडू होता. या निकालामुळे पाकिस्तान संघाला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळण्यास मदत झाली आहे. आता पाकिस्तानचं लक्ष आशिया कपकडे आहे. 30 ऑगस्ट रोजी नेपाळविरुद्ध होणार्या सलामीच्या सामन्यासह पाकिस्तान आशिया चषक जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. पण यावेळी त्यांच्यासमोर भारताचं कडवं आव्हान आहे.