आशिया कपमधील सुपर 4 फेरीत बांगलादेशने भारताचा पराभव केला आहे. भारतीय संघ आधीच अंतिम सामन्यात पोहोचला असल्याने विराट कोहलीसह काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान, या सामन्यात शुभमन गिलने शतक ठोकलं. मात्र यानंतरही भारताला पराभवाचा सामना करला. पराभवानंतर बोलताना शुभमन गिलने जर आपण सामान्यपणे खेळलो असतो तर सामना जिंकलो असतो हे मान्य केलं आहे. शुभमन गिलने 133 चेंडूंमध्ये 121 धावा ठोकल्या. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावत 265 धावा केल्या होत्या. पण भारताने 6 धावांनी हा सामना गमावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जेव्हा मी बाद झालो, तेव्हा माझं गणित चुकलं  होतं. मला वाटतं यात माझीच चूक आहे. जर मी आक्रमकपणे न खेळता संयमाने खेळलो असतो तर मला वाटतं आम्ही जिंकलो असतो. पण याच गोष्टींमधून आपण शिकत असतो. कधीतरी आपल्याला परिस्थितीचा नीट अंदाज लावता येत नाही आणि माझ्याकडून तेच झालं. मला यातून फार शिकण्यास मिळालं आहे. पण हा काही अंतिम सामना नव्हता आणि यातूनच आम्हाला शिकायचं आहे," असं शुभमन गिलने सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं.


भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली. फंलदाजी करताना शाकिब अल हसन आणि तोवहीद यांनी अर्धशतकं ठोकत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मदत केली. दरम्यान, भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यानंतर जलदगती गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. 


शुभमन गिल एकाकी झुंज देत असताना दुसरीकडे अक्षर पटेलने 34 चेंडूत 42 धावा ठोकल्याय. पण भारत विजयापासून 6 धावा दूर राहिला. शुभमन गिलने म्हटलं की, "आम्ही जास्तीत जास्त चेंडूंवर धावा कशा काढता येतील यावर चर्चा केली. खेळपट्टी धीमी होती आणि बॉल वळत असल्याने प्रत्येक चेंडूवर 1 धाव काढणं सोपं नव्हतं. आम्हाला वर्ल्डकपमध्ये यावर मात करावी लागणार आहे. कारण उत्तर भारतात बरेच सामने होणार असून त्यावेळी हिवाळा आहे. त्यामुळे आम्हाला सामन्यांमधील ब्रेक टाइममध्ये गोष्टी पूर्ववत कराव्या लागतील".


दरम्यान शुभमन गिलने यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनचं कौतुक केलं. शाकिबने 80 धावा ठोकल्या. "शाकिबने फार चांगली खेळी केली. त्याच्या खेळीमुळे सामना आमच्या हातून निसटला", असं त्याने म्हटलं.


दरम्यान, भारतीय संघ आता आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेशी भिडणार आहे. कोलंबोमधील आर प्रेमदसा मैदानात रविवारी हा सामना पार पडणार आहे.