Asia Cup फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, भारतातून `या` खेळाडूला लंकेत बोलावलं
Asia Cup Final : एशिया कपमधल्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया रविवारी एशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाणार असून भारत आणि श्रीलंका आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक धक्का बसला आहे.
Asia Cup India Squad Changed : एशिया कप 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. रविवारी फायनल रंगणार असून भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka Final) आमने सामने आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Tem India) एशियात कपवर आठव्यांदा नाव कोरण्यासाठी सज्ज झालीय. पण यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियातला स्टार ऑलराऊंडर दुखापतग्रस्त झाला असून त्याच्या फायनल खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याच्याऐवजी भारतातून एका खेळाडूला कोलंबोत बोलावल्याची चर्चा आहे.
स्टार ऑलराऊंडर दुखापतग्रस्त
टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) दुखापतग्रस्त झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षर पटेल अंतिम सामना खेळू शकणारन नाही. बांगलादेशविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात अक्षरला दुखापत झाली. अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार अंतिम सामन्याआधी तो दुखापतीतून सावरणं कठिण आहे. बांगलादेशविरुद्धच्या समन्यात अक्षरने शेवटच्या षटकात तुफान फलंदाजी करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अक्षर 42 धावा केल्या. तर गोलंदाजी करताना एक विकटेही घेतली.
या खेळाडूला बोलावलं
अक्षर पटेल अंतिम सामना खेळू शकला नाही तर त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) वर्णी लागू शकते. वॉशिंग्टन सुंदरला रविवारी कोलंबोत होणाऱ्या फायनलसाठी पाचारण करण्यात आलं आहे. आगामी एशियन गेम्ससाठीच्या भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली आहे. सध्या हा संघ बंगळुरुच्या राष्ट्रीय शिबिरात सराव करत आहे. अंतिम सामन्यानंतर वॉशिंग्टन सुंदर पुन्हा या शिबिरात दाखल होईल. चीनच्या हांगझाऊत 23 सप्टेंबरपासून एशियन गेम्सला सुरुवात होणार आहे.
टीम इंडियाचा प्रयोग फसला
सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियात प्रयोग करण्यात आला. टीम इंडियातले प्रमुख खेळाडू विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली. तर त्यांच्या जागी सूर्युकमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आली. पण टीम इंडियाचा हा प्रयोग सपशेल फसला. बांगलादेशने टीम इंडियाचा 6 धावांनी पराभव केला. तिलक वर्मा आणि सूर्या मोठा स्कोर करण्यात अपयशी ठरले. तिलक वर्मा 5 तर सूर्या 26 धावा करुन बाद झाले. प्रसिद्ध कृष्णालाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही.