Asia Cup 2023: सर्व क्रिकेटरसिकाचं लक्ष लागलेल्या आशिया कपला अखेर सुरुवात झाली आहे. मुल्तान येथे पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने नेपाळ संघाचा तब्बल 238 धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा आपल्या देशात खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. दरम्यान, यानंतर पाकिस्तान आता भारताशी भिडणार आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वाची या सामन्याकडे नजर असणार असून, दोन्ही देशांमधील प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळ अत्यंत सहजपणे पराभूत करणाऱ्या पाकिस्तानसमोर आता भारतीय संघाचं कडवं आव्हान असणार आहे. भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबरला श्रीलंकेत भिडणार आहेत. कँडी शहरात हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात तीन नवे रेकॉर्ड्स रचले जाण्याची शक्यता आहे. या रेकॉर्ड्सवर चाहत्यांची नजर असणार आहे. 


धोनीचा शतकांचा रेकॉर्ड 


भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 132 एकदिवसी सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने यामधील 55 सामने जिंकले असून, 77 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. यामधील 4 सामने अनिर्णित राहिले. दोन्ही संघांच्या बाजूने पाहिल्यास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानच्या सलमान बट यांनी प्रत्येक 5 शतकं ठोकली आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तीन फलंदाज आहेत ज्यांनी 4-4 शतकं ठोकली आहेत, तर 4 फलंदाजांनी 3-3 शतकं लगावली आहेत. 


पण विशेष बाब म्हणजे, सचिन तेंडुलकर वगळता एकाही भारतीय फलंदाजाला पाकिस्तानविरोधात 2 पेक्षा जास्त शतकं ठोकता आलेली नाहीत. 2 शतकं ठोकणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीही आहेत. त्यामुळे जर रोहित आणि विराटपैकी एकाने शतक ठोकलं तर पाकिस्तानविरोधात 2 पेक्षा जास्त शतकं ठोकणारा सचिननंतर दुसरा खेळाडू ठरेल. 


पाकिस्तानविरोधात 2-2 शतकं ठोकणाऱ्यांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन आणि नवज्योत सिंग सिद्धू आहेत. कोहली आणि विराटकडे या सर्वांना मागे पाडण्याची संधी आहे. 


बुमराहकडे कुंबळेचा रेकॉर्ड मोडण्याची संधी


दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहकडे एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानविरोधात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा लसिथ मलिंगा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 4 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, भारताची माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे  5 व्या क्रमांकावर आहे. त्याने 4 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. 


पाकिस्तानविरोधात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत भारतीय संघाकडून अनिल कुंबळे पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, सक्रीय खेळाडूंमधील बुमरहाने 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. जर पुढील सामन्यात बुमरहाने 4 विकेट्स घेतल्या तर तो कुंबळेचा रेकॉर्ड मोडत आशिया कपमध्ये पाकिस्तानविरोधात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज होईल. 


रोहित मोडणार गांगुलीचा रेकॉर्ड


जर रोहित शर्माने पाकिस्तानविरोधातील सामन्यात शतक ठोकलं तर तो आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे करेल. आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेचा माजी दिग्गज अर्जुन रणतुंगाच्या नावे आहे. त्याने 13 सामन्यात 594 धावा केल्या आहेत. यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि सौरव गांगुली आहेत. 


धोनीने 14 सामन्यात 579 धावा केल्या आहेत. तर गांगुलीने 9 सामन्यात 400 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 5 सामन्यात 317 धावा केल्या आहेत. जर रोहितने 83 धावा केल्या तर तो गांगुलीचा रेकॉर्ड मोडेल आणि आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल.