सर्वात वेगवान 13 हजार धावांचा बादशहा बनला कोहली; पाकविरुद्ध ठोकलं 47 वं शतक; सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
विराट कोहलीने पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
आशिया कपमधील पाकिस्ताविरोधात सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात स्फोटक फलंदाजी करत शतक ठोकलं. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या 13 हजार धावांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. रिझर्व्ह डेला खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने पहिल्याच चेंडूपासून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई कऱण्यास सुरुवात केली होती. विराटने 55 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. यानंतर त्याने फक्त 22 चेंडूत शतक ठोकलं. फक्त 84 चेंडूत विराट कोहलीने आपलं शतक पूर्ण केलं.
विराट कोहलीने फक्त 278 सामन्यांमध्ये 13 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. यासह विराट कोहली सर्वात वेगाने 13 हजार धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पाकिस्तानविरोधातील सामन्यातच आपल्या 13 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. पण सचिन तेंडुलकरला हा टप्पा गाठण्यासाठी 321 सामन्यांची वाट पाहावी लागली होती. पण विराट कोहलीने फक्त 278 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला.
इतकचं नाही तर विराट कोहलीच्याच नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 8000, 9000, 10000, 11000, 120000 धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. त्यात आता 13000 हजार धावा पूर्ण कऱण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावे झाला आहे. दरम्यान विराट कोहलीचं हे 47 वं शतक असून, सचिन तेंडुलकरची बरोबरी कऱण्यासाठी दोन शतकांची गरज आहे.
दरम्यान विराट कोहलीसह के एल राहुलनेही शतक ठोकलं. दोघांच्या खेळीमुळे भारताने पाकिस्तानविरोधात 356 धावांचा डोंगर उभा केला आहे. के एल राहुलचं हे सहावं शतक ठरलं. टॉस जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने 24.1 ओव्हरमध्ये 147 धावा केल्या असताना पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे आज राखीव दिवशी सामना खेळवण्यात आला.