Glenn Maxwell Fumes At BCCI: ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने बुधवारी नवी दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर नेदरलॅण्डविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये विक्रमी कामगिरी केली. ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक झळकावलं. मात्र सामना संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर अचानक मॅक्सवेलने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या एका निर्णयावर संताप व्यक्त केला. अगदी कठोर शब्दांमध्ये त्याने आपली नाराजी बोलून दाखवली आहे.


डोळे झाकून घेतले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैदानामध्ये करण्यात आलेल्या नाईट क्लब स्टाईल रोषणाईने ग्लेन मॅक्सवेल वैतागला. त्याने अशाप्रकारची रोषणाई करणं हा निव्वळ बावळटपणाची कल्पना आहे असं म्हटलं आहे. अशा रोषणाईमुळे डोकेदुखी होते असंही मॅक्सवेलने म्हटलं आहे. मॅक्सेवेलने केलेल्या दमदार आणि वेगवान खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलॅण्डवर 309 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये करण्यात आलेली रोषणाई पाहून मॅक्सवेलचं डोकं सटकलं. मॅक्सवेलने तब्बल 2 मिनिटं आपले डोळे हाताने झाकून घेतले होते. 


मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाला...


मॅक्सवेलने 44 बॉलमध्ये 106 रन केल्याने ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सच्या मोदल्यात 399 धावांपर्यंत मजल मारता आली. नेदरलॅण्डचा संघ 21 ओव्हरमध्ये 90 धावा करुन तंबूत परतला. मॅक्सेवेलला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. "मी अशी रोषणाई पर्थ येथील स्टेडियमवर बिग बॅश लीगदरम्यानच्या सामन्यात पाहिली होती," असं मॅक्सवेलने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं. 


मी दूर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो पण...


"ही रोषणाई पाहून माझं डोकं दुखू लागलं. माझ्या डोळ्यांना आजूबाजूचं परत सामान्यपणे पूर्वीसारखं दिसण्यासाठी काही वेळ लागला. क्रिकेटपटूंच्या दृष्टीने विचार केला तर ही सर्वात बावळटपणाची कल्पना आहे, असं मला वाटतं," असं स्पष्ट मत मॅक्सवेलने व्यक्त केलं आहे. "या रोषणाईचा त्रास होत असल्याने मी डोळे बंद करुन घेतले होते आणि त्या रोषणाईकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र हे फारच भयंकर होतं. फारच भयंकर कल्पना आहे की. चाहत्यांची उत्तम आहे मात्र खेळाडूंसाठी तितकीच भायानक आहे," असं मॅक्सवेलने स्पष्टपणे सांगितलं. 



नुकत्याच केलेल्या अपग्रेडमध्ये रोषणाईची सोय


वर्ल्ड कप 2023 च्या सुरुवातीच्या आधी बीसीसीआयने या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येत असलेल्या मैदानांची डागडुजी करुन घेतली आहे. यामध्ये दिल्लीबरोबरच भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील मैदानांचा समावेश आहे. या नुतनीकरणावेळी मैदानामध्ये रोषणाईची सोयही करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान अनेक मैदानांमध्ये लाल, निळ्या रंगाची रोषणाई पाहायला मिळते. अनेक सामन्यांनंतरही ही रोषणाई दिसून येते. बऱ्याच सामन्यानंतर लेझर शो सारख्या गोष्टीही दिसून आल्या आहेत. मात्र या गोष्टी खेळाडूंसाठी चांगल्या नाहीत असं मॅक्सवेलने स्पष्टपणे सांगितलं आहे.