`...म्हणून तो त्या लायकीचा नाही`; डेव्हिड वॉर्नरवर भडकला मिशेल जॉन्सन
Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरबद्दल खळबळजनक विधान केल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
AUS vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 37 वर्षीय सलामीवीर डेव्हिड वॉर्नरलाही ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. मात्र आता डेव्हिड वॉर्नरवर टीका करताना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने अतिशय स्फोटक विधान केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने त्याचा माजी सहकारी डेव्हिड वॉर्नरविरुद्ध प्रश्न उपस्थित केला आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणांमध्ये वॉर्नरने आपली भूमिका स्वीकारली नसल्याचा आरोपही मिशेलने केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नरला संधी दिल्याने मिचेल जॉन्सनने संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान पर्थ येथे खेळवला जाणार आहे.
द वेस्ट ऑस्ट्रेलियनसाठी लिहिलेल्या एका लेखात मिचेल जॉन्सनने वॉर्नवर टीका केली आहे. 2018 मध्ये बॉल टॅम्परिंगची घटना घडल्यानंतर आणि त्यानंतर 1 वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर हा सन्मानाने निरोप घेण्यास पात्र नाही, असे मिचेल जॉन्सनचे म्हणणे आहे. मिचेल जॉन्सनने 2018 मध्ये झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेल्या डेव्हिड वॉर्नरला आरोपी म्हटलं आहे. पाच वर्षे झाली. डेव्हिड वॉर्नरच अजूनही उद्दामपणे वागत आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निरोपाच्या मालिकेसाठी आम्ही तयारी करत आहोत, कोणी सांगेल का हे का करतोय? संघर्ष करणाऱ्या सलामीवीराला स्वतःच्या निवृत्तीची तारीख का निवडावी लागते?, असं जॉन्सनने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या खेळाडूला हिरोसारखा निरोप का द्यावा? सँडपेपरगेटमध्ये वॉर्नर एकटा नसला तरी, तो त्या वेळी संघातील एक महत्त्वाचा खेळाडू होता आणि त्याला त्याच्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करायला आवडत होता. आता वॉर्नर ज्या पद्धतीने निरोप घेत आहे, तो अहंकार आहे. यामुळे आपल्या देशाचा अपमान होत आहे, असेही मिचेल जॉन्सन म्हणाला.
"वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार नाही आणि या घटनेनंतर तो कधीही होण्याच्या लायकीचा नाही. त्याने आजीवन नेतृत्व बंदी घालून आपली कारकीर्द संपवली. होय, त्याचा एकूण रेकॉर्ड चांगला आहे आणि काही लोक म्हणतात की तो आमच्या महान सलामीवीरांपैकी एक आहे. पण त्याची कसोटी क्रिकेटमधील शेवटची तीन वर्षे सामान्य राहिली आहेत," असेही मिचेल जॉन्सनने म्हटलं आहे.