25 बॉलमध्ये 110 धावा... ख्रिस गेललाही लाजवेल अशी खेळी करत तिने एकटीनेच जिंकवला सामना
Women Scores 100 With Boundaries: संघाची कर्णधार म्हणून ती मैदानात उतरली. आपण एकटेच सामना जिंकवून देऊ शकतो अशा शैलीत ती फटकेबाजी करु लागली.
Women Scores 100 With Boundaries: क्रिकेटमध्ये अनेक ऐतिहासिक खेळी मागील काही काळामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. जेव्हा जेव्हा चौकार आणि षटकारांचा पाऊस पडल्याची चर्चा आपण करतो तेव्हा विरेंद्र सेहवाग, वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्ससारख्या फलंदाजांची आपल्याला आवर्जून आठवण होतं. या फलंदाजांना नेमकी कशी गोलंदाजी करावी असा प्रश्न अनेकदा गोलंदाजांनाही पडायचा. मात्र आता गोलंदाजीची पिसं काढण्याचा हाच ट्रेण्ड थेट महिला क्रिकेटमध्येही दिसत आहे. ख्रिस गेललाही लाजवेल अशी खेळी वेस्ट इंडिजची माहिला कर्णधार हॅली मॅथ्यूजने केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यामध्ये मॅथ्यूजने केलेल्या तुफान फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाज हतबल दिसल्या.
212 धावांचा डोंगर
वेस्ट इंडिजच्या महिला संघाविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियन महिलांनी या सामन्याची सुरुवातच आक्रमक केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियन संघाने घेतला. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध सलामीवीर एलिस पेरीने 70 धावांची भन्नाट खेळी केली. तसेच एलिसची सहकारी लिचफिल्डने 50 धावांची खेळी केल्याने ऑस्ट्रेलियन संघाला 20 ओव्हरमध्ये 212 धावांचा डोंगर उभा केला.
चौकार आणि षटकारांनी झळकावलं शतक
एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज जणू मी एकटीच संघाला सामना जिंकवून देऊ शकते अशापद्धतीने फलंदाजी करत होती. तिने केवळ 25 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर हेलीने धावांची गती वाढवली. तिने केवळ 53 चेंडूंमध्ये शतक झळकावलं. हेलीने 64 चेंडूंमध्ये 132 धावांची खणखणीत खेळी करत आपल्या संघाला विजय सुखकर करुन दिला. या खेळीमध्ये हेलीने 20 चौकार आणि 5 षटकार लगावले. म्हणजेच तिने 20 चौकारांच्या 80 धावा आणि 5 षटकारांच्या 30 धावा असा 110 धावा केवळ 25 चेंडूंमध्ये केल्या. केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने तिने शतक झळकावलं. 132 पैकी अवघ्या 22 धावा तिने पळून काढल्या.
गेलचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम कोणालाच मोडता आलेला नाही
वेस्ट इंडिजच्याच ख्रिस गेलने इंडियन प्रिमिअर लीगमध्ये अशाप्रकारे आक्रमक खेळी केली होती. तिने 2013 मध्ये केवळ 30 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. यावेळी त्याने 66 चेंडूंमध्ये 175 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 17 चौकार आणि 13 षटकार लगावले होते. ख्रिस गेलच्या या विक्रमची बरोबरी अद्याप कोणीही करु शकलेलं नाही.