AUS vs AFG : घायाळ मॅक्सवेल वाघासारखा लढला! रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय; सेमीफायनलमध्ये एन्ट्री!
Cricket World Cup 2023 Australia vs Afghanistan : वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्ध उभ्या उभ्या डबल सेंच्यूरी मारून इतिहास रचला आहे. एकाबाजूला सवंगडी बाद होत असताना, मॅक्सवेल मैदानात टिकून राहिला. पायाला दुखापत झाली, तरी मैदान सोडलं नाही, तो लढला आणि जिंकला सुद्धा..
ICC World Cup 2023 Australia vs Afghanistan : डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, असा सामना आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहायला मिळाला आहे. संयम आणि आत्मविश्वास याचं जिंवत उदाहरण ऑस्ट्रेलियाच्या स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने अफगाणिस्तानविरुद्धच्या खेळीतून मांडलंय. एकाबाजूला सवंगडी बाद होत असताना, मॅक्सवेल मैदानात टिकून राहिला. पायाला दुखापत झाली, तरी मैदान सोडलं नाही, तो लढला आणि जिंकला सुद्धा.. ग्लेन मॅक्सवेल याची आज ऐतिहासिक झुंजार खेळी पहायला मिळाली. वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेल याने उभ्या उभ्या डबल सेंच्यूरी मारून इतिहास रचला आहे. इब्राहिम झद्रान (Ibrahim Zadran) याच्या वादळी शतकामुळे अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभी करता आली होती. मात्र, अफगाणिस्ताने दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना कांगारू एकामागून एक कोसळले अन् अफगाणी खेळाडूंनी कोणालाही विश्वास बसणार नाही, अशी कामगिरी करून दाखवली. या सामन्यात जखमी ग्लेन मॅक्सवेल याने वाघासारखी लढत दिली अन् वादळी दुहेरी शतक (double century) ठोकलं. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये (Australia in semis) एन्ट्री मारली आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत विश्वचषकात 287 धावांचा यशस्वी धावांचा पाठलाग केला होता. त्यामुळे पाच वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाला 292 धावसंख्येचा पाठलाग करता येईल का ? असा सवाल विचारला जात होता. ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड दुसऱ्याच ओव्हरमध्ये बाद झाला अन् कांगारूंची पडझड सुरू झाली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांना मैदानात टिकता आलं नाही अन् ऑस्ट्रेलियाची परिस्थिती 49 वर 4 आऊट अशी झाली. तिथून पुढे अफगाणिस्तानने फासे आवळले अन् ठराविक टप्प्यात विकेट घेत ऑस्ट्रलियाला 91 वर 7 विकेट्स अशा परिस्थितीत आणलं. मात्र, ऑस्ट्रेलियाला ग्लेन मॅक्सवेल कडवी टक्कर देत होता. मॅक्सवेलने मनावर घेतलं अन् हाणामारी सुरू केली. सामना जिंकायचं असले तर प्रत्येक बॉल महत्त्वाचा हे मॅक्सीला चांगलंच माहित होतं. त्याने सर्व गोलंदाजांविरुद्ध सपाटा चालू केली. शतक ठोकलं पण अजून लक्ष लांब होतं. मॅक्सवेल थांबला नाही. त्याचवेळी त्याला कॅम्प्स आले. मात्र, त्याने मैदान सोडलं नाही. एकट्याने उभ्या उभ्या दोनशे धावा केल्या. त्याचं हा आघात पाहून सर्वांच्या डोळ्याचं पारणं फिटलं.
आणखी वाचा - इतिहास रचताच शतकवीर इब्राहिमने का मानले सचिन तेंडूलकरचे आभार? म्हणाला 'तो आला अन्...'
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया ताकद दाखवेल, अशी शक्यता होती. मात्र, अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर ऑस्ट्रेलियावर भारी पडले. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी चांगली सुरूवात दिली. गुरबाज बाद झाल्यानंतर इब्राहिमने एक बाजू लावून धरली अन् खणखणीत शतक ठोकलं. इब्राहिम झद्रान हा विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला. त्यानं वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात ही कामगिरी बजावली. इब्राहिम झादराननं 143 चेंडूंत नाबाद 129 धावांची खेळी उभारली. अफगाणिस्तानची इनिंग अखेरच्या टप्प्यात असताना राशिद खान धावून आला. राशिदने 18 बॉलमध्ये 35 धावांची वादळी खेळी केली आणि संघाला 291 धावांवर पोहोचवलं.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.