पर्थ : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर १३२/४ एवढा झाला आहे. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या ४३ रनच्या आघाडीमुळे आता ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी १७५ रन एवढी झाली आहे. दिवसाअखेरीस उस्मान ख्वाजा ४१ रनवर तर टीम पेन ८ रनवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा ओपनर एरॉन फिंच रिटायर्ड हर्ट झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या ३२६ रनला प्रत्युत्तर म्हणून भारतीय टीम २८३ रनवर ऑल आऊट झाली. कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकामुळे भारताला एवढी मजल मारता आली. या दोघांमध्ये ९१ रनची पार्टनरशीप झाली. विराट कोहलीनं १२३ तर अजिंक्य रहाणेनं ५१ रनची खेळी केली.


ओपनिंगला आलेल्या मुरली विजय आणि केएल राहुलनं पुन्हा एकदा भारताची निराशा केली. मुरली विजय शून्य रनवर तर राहुल २ रन करून आऊट झाला. पहिल्या मॅचमध्ये शतक करणाऱ्या चेतेश्वर पुजारानं तग धरण्याचा प्रयत्न केला, पण १०३ बॉलमध्ये २४ रन केल्यानंतर पुजाराही आऊट झाला. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायननं सर्वाधिक ५ विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि जॉस हेजलवूडला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. पॅट कमिन्सनं विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली.


तिसऱ्या दिवशी नॅथन लायननं पहिल्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अजिंक्य रहाणेला आऊट केलं. त्यानंतर कोहलीने जबाबदारीने खेळ करताना भारताच्या रनचा वेग कायम राखला. त्याने २१४ बॉलमध्ये शतक पूर्ण केले. विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे २५वं शतक आहे.