मेलबर्न : टीम इंडियाने (India) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (Australia Vs India 2nd Test ) पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली. मात्र, आपल्या डावाची सुरुवात खराब केली. टीम इंडियाला पहिला धक्का बसला असून मयांक अग्रवाल शून्यावर बाद झाला. त्याआधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला (Australia )पहिल्याच दिवशी १९५ धावांवर गुंडाळले. टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह आणि आर आश्विनचा भेदक माऱ्यापुढे कांगारुच्या खेळाडूंचा टिकाव लागू शकला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मुंबईच्या अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगला खेळ केला. जसप्रीत बुमराह, आर. आश्विन आणि नवोदीत मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गडगडला.


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने तिसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाता पहिला धक्का देत सलामीवीर जो बर्न्सला माघारी पाठवले. त्यानंतर मॅथ्यू वेड, लाबुशेन यांनी संघाचा डाव सावरला. परंतू ऑस्ट्रेलियावर वर्चस्व मिळवण्यासाठी कर्णधार रहाणेने गोलंदाजीत बदल करत लगेच आश्विनला संधी दिली. आश्विननेही मॅथ्यू वेडला बाद केले. वेड ३० धावा काढून बाद झाला. त्यानंतर स्टिव्ह स्मिथही आश्विनच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. ऑस्ट्रेलिया संघाची ३ बाद ६५ अशी धावसंख्या झाली.


टीम इंडियाच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागादीरी केली. अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा बुमराहला संधी दिली, बुमराहनेही ट्रॅविस हेडला रहाणेकरवी झेलबाद केले. हेड ३८ धावा करुन माघारी परतला. यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही मैदानावर स्थिरावलेल्या लाबुशेनला माघारी पाठवले. शुबमन गिलने लाबुशेनचा सुरेख झेल घेतला. लाबुशेनने ४८ धावा केल्यात. चहापानापर्यंत ५ बाद १३६ अशी अवस्था असलेल्या ऑस्ट्रेलियाची पडझड झाली. टीम इंडियाकडून बुमराहने ४, आश्विनने ३, सिराजने २ तर जाडेजाने १ बळी घेतला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेनने ४८ तर ट्रॅविस हेडने ३८ धावा करत एकाकी लढा दिला. मात्र, त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.