WTC मधून ऑस्ट्रेलिया बाहेर? कांगारूंच्या पराभवाचा फायदा `या` देशाला मिळणार, पाहा कसं आहे गणित?
फायनलसाठी 3 टीम शर्यतीत असल्याने भारताविरूद्ध पहिली टेस्ट गमावणं कांगारूंना महागात पडू शकतं. बॉर्डर-गावस्कर सिरीजमध्ये पहिला सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाच्या टीमला डब्लूटीसी (WTC) च्या फायनल गाठणं कठीण झालं आहे.
ICC World Test Championship : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border–Gavaskar Trophy) नागपूर टेस्टमध्ये टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. एक इनिंग आणि 132 रन्सने पहिल्या सामन्यात भारताने विजय नोंदवला. सामना गमावल्याचं दुःख असतानाच ऑस्ट्रेलिया टीमसमोर (Australia Team) अजून एक मोठं आव्हान समोर येऊन ठेपलं आहे. भारताकडून झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची टीम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळण्यासाठी श्रीलंका अजूनही शर्यतीत असल्याचं म्हटलं जातंय.
यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल इंग्लंडच्या ओव्हल मैदानात रंगणार आहे. दरम्यान फायनलचा सामना कोणत्या 2 टीममध्ये हे अजून निश्चित झालेलं नाही. यामध्ये भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे.
फायनलसाठी 3 टीम शर्यतीत असल्याने भारताविरूद्ध पहिली टेस्ट गमावणं कांगारूंना महागात पडू शकतं. बॉर्डर-गावस्कर सिरीजमध्ये पहिला सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाच्या टीमला डब्लूटीसी (WTC) च्या फायनल गाठणं कठीण झालं आहे. जाणून घेऊया ऑस्ट्रेलियाची टीम कशी बाहेर पडू शकते.
पराभवानंतर कांगारूंची टीम होणार WTC तून बाहेर?
टीम इंडियाचे सध्या WTC पॉईंट्स टेबलमध्ये 61.67 पॉईंट्स झाले आहेत. तर पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचं नुकसान झालं असून त्यांचे पॉईंट्स 70.83 आहेत. अजूनही ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या स्थानावर कायम आहे. भारताच्या या विजयासह पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठायची संधी मिळणार आहे. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाला या शर्यतीतून बाहेर काढण्याची संधीही भारताकडे आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाचा चांगल्या फरकाने पराभव करत पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली आहे. किमान 62.50 टक्के पॉईंट्स मिळवण्यासाठी भारताला आता सिरीजमधील उरलेल्या तीनपैकी दोन सामने जिंकावे लागतील. जर, भारताने उरलेले तीन्ही सामने जिंकले, तर टीमची संभाव्य टक्केवारी 68.06 असेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) साठी मोजणी केली आहे. आयसीसीनुसार, ऑस्ट्रेलियाने पुढील तीन टेस्ट सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास त्यांना 64.91 टक्के स्कोर गाठण्यात मदत होईल, तर ड्रॉ झाल्यास त्यांना 61.40 टक्के गुण मिळतील. दुसरीकडे श्रीलंका त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसह केवळ 61.11 पॉईंट्सची टक्केवारी गाठू शकते.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे अजून 3 सामने बाकी आहेत. या सिरीजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.