दुबई : स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा पुनरागमनासाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमला आणखी वाट पाहावी लागणार आहे. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी सीरिजसाठी या दोघांची निवड व्हायची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्ध २२ ते ३१ मार्चपर्यंत ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर येईल. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्येही ५ वनडे मॅचची सीरिज खेळवली जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचवेळी बॉलशी छेडछाड केल्यामुळे स्मिथ, वॉर्नर आणि कॅमरून बॅन्क्रॉफ्ट यांचं निलंबन करण्यात आलं होतं. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरची १ वर्षाची बंदी पुढच्या महिन्यात २९ तारखेला संपणार आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळणं जवळपास अशक्य आहे. स्मिथ आणि वॉर्नरसोबत बॅन्क्रॉफ्टचंही निलंबन करण्यात आलं होतं, पण त्याला ९ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. बॅन्क्रॉफ्टवरची बंदी मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात उठली. यानंतर तो ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीगमध्ये खेळला.


स्मिथ आणि वॉर्नर याच्या पुनरागमनाची वाट ऑस्ट्रेलियातील क्रिकेट चाहते बघत आहेत. पण या दोन्ही क्रिकेटपटूंना दुखापत झाली आहे, त्यामुळे हे दोन्ही खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळणार नाहीत. हे दोन्ही खेळाडू कधी फिट होतील याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.


ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्ध पहिली वनडे २२ मार्चला शारजाहमध्ये, दुसरी वनडे २४ मार्चला शारजाहमध्ये, तिसरी वनडे २७ मार्चला अबु धाबीमध्ये, चौथी वनडे २९ मार्चला दुबईमध्ये आणि पाचवी वनडे ३१ मार्चला दुबईमध्ये खेळणार आहे. याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्येही वनडे सीरिज होईल.


मिळालेल्या माहितीनुसार डेव्हिड वॉर्नरची दुखापत जास्त गंभीर आहे. स्मिथच्या मॅनेजरनं सांगितलं की, 'स्मिथच्या कोपरावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी होती. स्मिथला ठीक होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.'