मेलबर्न : विजयरथावर स्वार असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार भारत दौऱ्यावर येण्याआधीच घाबरल्याचं चित्र आहे. एरॉन फिंचने भारतात पोहोचण्याआधीच भीती व्यक्त केली आहे. भारत दौऱ्यामध्ये तुमचा आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात होते. आपण स्वत:वरच संशय घ्यायला सुरुवात करतो, असं एरॉन फिंच म्हणाला आहे. १४ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या एक ते दोन दिवसात ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. त्याआधी एरॉन फिंच क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटशी बोलत होता. 'भारतीय उपखंडातल्या परिस्थितीमध्ये प्रदर्शन करण्यात आत्मविश्वास मोठी भूमिका बजावतो. तुम्ही जी योजना बनवता, ती मैदानात कशी अमलात आणायची हे आत्मविश्वासावर अवलंबून असतं. तुम्ही भारतात खेळता तेव्हा स्वत:वरच संशय घेता. खासकरुन भारतीय टीम जेव्हा सर्वोत्तम खेळत असते. भारत पाकिस्तान किंवा श्रीलंका, तुम्ही कुठेही खेळा, तुमचा आत्मविश्वास कमी होणं शक्य आहे,' असं वक्तव्य फिंचने केलं आहे.


ऑस्ट्रेलियाच्या टीमने नुकतंच पहिले पाकिस्तान आणि मग न्यूझीलंडला व्हाईट वॉश केलं आहे. भारताचा ऑलराऊंडर इरफान पठाण यानेही ऑस्ट्रेलियाला हा भारत दौरा सोपा जाणार नाही, असं मत मांडलं आहे.


'पहिलेच्या गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम मजबूत होती. तेव्हा ऑस्ट्रेलिया प्रत्येक ठिकाणी चांगली खेळायची. ऑस्ट्रेलियाची बरोबरी करणं हाच आमचा प्रयत्न असायचा. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भारतीय टीममध्ये जास्त प्रतिभावान खेळाडू आहेत. भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे भारत वनडे सीरिज जिंकण्याची दावेदार आहे,' अशी प्रतिक्रिया पठाणने दिली आहे.