ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणतो टॉस गमावणंच फायद्याचं
भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पर्थमध्ये होणारा हा सामना नव्या ऑप्टिस स्टेडियमवर होणार आहे. आत्तापर्यंत या स्टेडियमवर दोन आंतरराष्ट्रीय मॅच झाल्या असल्या तरी, ही पहिलीच टेस्ट असेल. एकही टेस्ट न झाल्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल याबद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या पिचवर टॉस हा जुगार ठरू शकतो, अशात टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची का बॉलिंग, तसंच कोणत्या खेळाडूंचा टीममध्ये समावेश करायचा हा निर्णय घेणं कर्णधारांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
या मैदानामध्ये पहिलीच टेस्ट मॅच होत असल्यामुळे टॉस गमावणंच फायद्याचं असेल, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननं दिली आहे. पर्थच्या खेळपट्टीवर सध्या हिरवेगार गवत आहे. त्यामुळे या खेळपट्टीचा फायदा फास्ट बॉलरना होईल. खेळपट्टीवर अशाचप्रकारे गवत ठेवलं जाईल, अशी अपेक्षा भारताचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केली आहे.
खेळपट्टीवरचं गवत पर्थमधली गरमी बघता खेळपट्टी तुटण्याची आणि भेगा पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अशावेळी टॉस गमावून विरुद्ध कर्णधारालाच निर्णय घेऊन देणं योग्य ठरतं, असं वक्तव्य पेननं केलं.
पिच क्युरेटरनी सांगितल्याप्रमाणे ही खेळपट्टी पर्थचं याआधीचं मैदान असलेल्या वाका प्रमाणेच जलद असेल. वाकाची खेळपट्टी ही जगातली सगळ्यात जलद खेळपट्टी मानली जाते.
ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये कोणताही बदल नाही
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसंच भारत आणि जास्त फास्ट बॉलर घेऊन मैदानात उतरू शकते, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला वाटतंय. रोहित शर्मा आणि अश्विनला दुखापत झाल्यामुळे भारतीय टीमनं काही बदल केले आहेत. भारताच्या प्रत्येक खेळाडूची ताकत आणि त्यांची कमजोरी आम्हाला माहिती आहे. याबद्दल आम्ही रणनितीही बनवली आहे. पण मैदानात एकजुटीनं प्रदर्शन केलं तरच आम्ही यशस्वी होईल, असं पेन म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननं विजय झाला होता. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीम
विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव