कार अपघातात Andrew Symonds चं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा
शेन वॉर्ननंतर जगात आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन झालं आहे.
मुंबई : शेन वॉर्ननंतर जगात आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. वॉर्ननंतर आणखी एक दिग्गज खेळाडू गमावल्याची भावना आहे. क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघात झाला. या कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. क्वीन्सलँडच्या टाऊन्सविले इथे ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला अपघात झाला होता.
सायमंड्सच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
एकाच वर्षात दोन दिग्गज व्यक्तीमत्त्व गेल्याने क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाची आहे. या दुर्घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सायमंड्सला अपघातानंतर जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांच्या टीमने त्याला जीवदान देण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र यश मिळालं नाही.
साधारण 11 वाजण्याच्या सुमारास एलिस रिवर ब्रिजजवळ कारचा अपघात झाला. कार वेगात असल्याने रस्त्यावर उलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सायमंड्सला या अपघातात गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती नाजूक होती. डॉक्टरांना वाचवण्यात यश आलं नाही. या घटनेमुळे क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना आहे. दिग्गज क्रिकेटर्सनी त्याला ट्वीट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.