Australian Open 2019 : आणखी एक उलटफेर, सेरेना विलियम्सचं आव्हान संपुष्टात
टेनिस स्टार सेरेना विलियम्स हिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मेलबर्न : आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वात आपल्या खेळाच्या बळावर दणक्यात पुनरागमन करणाऱ्या टेनिस स्टार सेरेना विलियम्स हिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. मार्गरेट कोर्टच्या २४ ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची तिची संधी हुकली आहे.
ऑस्ट्रेलिया ओपन २०१९ च्या उपउपांत्य फेरीत तिला कॅरोलिना प्लीस्कोवा हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. कॅरोलिनाने सेरेनाला ६-४, ४-६, ७-५ अशा सेटमध्ये पराभूत केलं आणि स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. या पराभवामुळे २४ व्या वेळेस एखाद्या ग्रँड स्लॅमवर आपलं नाव कोरण्याचं सेरेनाचं स्वप्न अपूरं राहिलं. असं असलं तरीही पुढच्या काळात ती पुन्हा एकदा आपल्या खेळाच्या बळावर दणक्यात यश संपादन करेल असा क्रीडारसिकांचा विश्वास आहे.
दरम्यान, सेरेनाला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या प्लीस्कोवापुढे आता नाओमी ओसाका हिचं आव्हान असणार आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवत ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदाच्या आणखी एक पाऊल जवळ जाण्यासाठी त्यांच्यात लढत होणार आहे. कॅरोलिना ही तिसऱ्यांना एखाद्या ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये फ्रेंच ओपन आणि गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये यूएस ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती. त्यामुळे नाओमीसोबतची तिची लढत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.