मुंबई : आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गुरुवारी मालदीवला रवाना झाले आहेत. मालदीवमध्येच ते ऑस्ट्रेलियन सीमा उघडत नाहीत तो पर्यंत थांबतील. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने याबाबत माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियाकडून कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतातून येणाऱ्यांसाठी 15 मे पर्यंत बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाचे 38 सदस्य ज्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक, पंच, समालोचक यांचा समावेश आहे, ते सर्व सध्या मालदीवमध्ये आहेत. सीएसकेचे बॅटींग कोच मायकेल हसी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ते भारतातच राहिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब केल्यानंतर दोन दिवसांच्या आत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतातून पाठवण्याबाबतच्या जबाबदारीबद्दल सीए आणि एसीएने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) आभार मानले. हसी यांच्या संदर्भात मंडळाने म्हटले आहे की, माइक हसी यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत आणि आयपीएलच्या फ्रेंचायझी चेन्नई सुपरकिंग्सच्या देखरेखीखाली आहे. ते सुरक्षितपणे ऑस्ट्रेलियात परत येतील याची खात्री करण्यासाठी सीए आणि एसीए बीसीसीआय बरोबर संपर्कात आहे. आयपीएलमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाची सुरक्षा बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने घेतली होती.


आयपीएलचे आयोजन कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत केले जात होते. प्रेक्षकांविना सामने खेळले जात होते. यानंतरही, कोरोनाने बायो बबलमध्ये प्रवेश केला. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) चे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर आणि चेन्नई सुपर किंग्जचा बॉलिंग कोच एल बालाजी, सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर वृध्दिमान साहा आणि दिल्ली कॅपिटलचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्यानंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.