बंगळुरु : बंगळुरु टीमची आयपीएलच्या १२ व्या पर्वातील सुरुवात निराशाजक झाली आहे. बंगळुरुने खेळलेल्या ४ मॅच गमावल्या आहेत. त्यामुळे बंगळुरुला पहिल्या विजयाची वाट पाहावी लागत आहे. चिन्नस्वामी स्टेडिअमवर म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर आज शुक्रवारी (५ एप्रिल) बंगळुरु  विरुद्ध कोलकाता यांच्याच लढत रंगणार आहे. या मॅचला रात्री ८ वाजता सुरुवात होणार आहे. या मॅचद्वारे बंगळुरुला आयपीएलच्या या पर्वातील पहिला विजय मिळवण्याची संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुकडे विराट कोहली, एबी डीविलियर्स यासारख्या तगड्या बॅट्समनचा भरणा आहे. तरीदेखील बंगळुरुला सातत्याने अपयश येताना दिसत आहे. राजस्थान विरुद्ध झालेल्या अखेरच्या मॅचमध्ये पार्थिव पटेलने ६७ रनची खेळी केली होती. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला कोणत्याही खेळाडूला योग्य साथ देता आली नाही. मोईन अली, कोलिन डी ग्रँडहोम आणि मार्कस स्टोइनिस हे खेळाडू २०-२० क्रिकेट मधील मातब्बर खेळाडू आहेत. परंतू त्यांना आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करता आलेला नाही.    


अनुभवाची कमतरता


बंगळुरुच्या बॉलरमध्ये अनुभवाची कमतरता जाणवत आहे. राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये युजवेंद्र चहलने २ विकेट घेतल्या. पंरतू इतर कोणताही बॉलर चांगली कामगिरी करताना दिसत नाही आहे. मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी या बॉलरकडे अनुभव कमी प्रमाणात आहे. त्यामुळे या बॉलरना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयपीएलच्या या पर्वापासून अपयशी कामगिरी होत असल्याने बंगळुरु टीममध्ये बदल केले जाऊ शकतात. 


आतापर्यंत झालेल्या ४ मॅचमध्ये बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे बंगळुरु अंकतालिकेत अखेरच्या क्रमांकावर आहे. तर कोलाकाताने खेळलेल्या ३ मॅचपैकी २ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे कोलकाता ४ गुणांसह अकंतालिकेत ४ थ्या क्रमांकावर आहे.


बंगळुरुपुढे कोलकाताचे तगडे आव्हान


कोलकाता टीमच्या बॅटिंगची मदार ही रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक, नितिश राणा या खेळा़डूंवर असणार आहे. या खेळाडूंमध्ये निर्णायक भूमिका बजावण्याची आणि टीमला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. तसेच गेल्या काही मॅचपासून आंद्रे रसेल हा अष्टपैलू कामगिरी करत आहे. त्यामुळे बंगळुरुपुढे रसेलला अडवण्याचे आव्हान असणार आहे.


कोलकाताकडे पियूष चावला, सुनिल नारायण आणि कुलदीप यादव या ३ फिरकीपटूंची दमदार तुकडी आहे. या फिरकीपटूंनी आपल्या फिरकीची जादू अनेकदा दाखवली आहे. त्यामुळे बंगळुरुच्या तुलनेत कोलकाताची टीम वरचढ दिसत आहे.              


बंगळुरु : विराट कोहली (कॅप्टन), एबी डीविलियर्स , पार्थिव पटेल (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमेयर, शिवम दूबे, नाथन कुल्टर-नाइल, वॉशिंगटन सुंदर, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, हेनरिक क्लासेन , मोइन अली, कोलिन डी ग्रँडहोम, पवन नेगी, टिम साउथी, अक्षदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदत्त पडिक्कल, गुरकीरत सिंह, प्रार्थना रे बर्मन, कुलवंत खेजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंह.


कोलकाता : दिनेश कार्तिक (कॅप्टन), सुनील नरेन, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रैथवेट, जो डेनली, लॉकी फग्र्यूसन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, हैरी गर्नले, कुलदीप यादव, पीयूष चावला, नितीश राणा, संदीप वॉरियर, केसी करियप्पा, शुभमन गिल, श्रीकांत मुंधे, निखिल नाईक, पृथ्वी राज आणि प्रसिद्ध कृष्णा.