IND vs BAN : पाकिस्तानच्या नांग्या ठेचणाऱ्या कॅप्टन शांतोने टीम इंडियाला दिली वॉर्निंग, म्हणाला...
Najmul Hossain Shanto warn team india : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बांगलादेशचा कॅप्टन शांतो याने टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिला आहे.
IND vs BAN 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडिया तब्बल 5 आठवड्यानंतर मैदानात उतरणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या नांग्या ठेचून बांगलादेशच्या कॅप्टनने टीम इंडियाला वॉर्निंग दिली आहे. बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतो याच्या नेतृत्वात बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये घुसून पाणी पाजलं आहे. त्यानंतर आता शांतोने भारताविरुद्ध एल्गार केलाय.
काय म्हणाला कॅप्टन शांतो?
भारताविरुद्ध पुढील कसोटी मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या विजयामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळेल. या परिस्थितीत मेहदीने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि 5 बळी घेतले ते खूपच प्रभावी आहे, आशा आहे की तो भारताविरुद्धही अशीच कामगिरी करू शकेल, असं कॅप्टन नजमुल हुसेन शांतो याने म्हटलं आहे. शांतो पाकिस्ताननंतर भारतावर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता रोहित शर्माला चांगली तयारी करावी लागेल.
पाकिस्तानचा कॅप्टन भडकला
मला वाटतं की कसोटी क्रिकेटमध्ये फिटनेसशिवाय बरंच काही असतं. कसोटीत आम्हाला तीन गोलंदाज आणि 2 फिरकीपटू कमी होते. आम्ही मागील पराभवातून काहीही शिकलो नाही. मी आणि सईम आणखी चांगली फलंदाजी करू शकलो असतो पण आम्हाला ते जमलं नाही. काही गोष्टी अजून शिरायला पाहिजे, ते आमच्या फलंदाजांना जमलं नाही, त्यामुळे मी खूप नाराज आहे, असं पाकिस्तानचा कॅप्टन शान मसूदने म्हटलं आहे.
बांगलादेशविरुद्धची टेस्ट सिरीज तोंडावर असताना टीम इंडियाला मोठा धक्का आहे. बुची बाबूला स्पर्धेत शनिवारी तामिळनाडूविरुद्ध फिल्डिंग करताना सूर्याच्या हाताला दुखापत झाली. सूर्या जरी टेस्ट संघाचा भाग नसला तरी देखील सूर्याने कसोटी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) सूर्याच्या दुखापतीबद्दल अजून काहीही माहिती दिली नाहीये. मात्र, तो बांगलादेशविरुद्ध टेस्ट सामना खेळणार नसल्याचं मानलं जातंय.
बांगलादेशचा संभाव्य संघ - नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.
टीम इंडियाचा संभाव्य संघ - रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.