क्रिकेट सामन्यात WWE स्टाइल हाणामारी! 6 बांगलादेशी खेळाडू रुग्णालयात; पाहा Video
Bangladesh Cricket WWE Like Fight: अचानक दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये आधी बाचाबाची झाली आणि नंतर दोन्ही बाजूचे खेळाडू एकमेकांना हाणामार करु लागले.
Bangladesh Cricket WWE Like Fight: क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. क्रिकेटची महती सांगणारं Cricket is a gentlemen's game हे वाक्य जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेकदा खेळाडूंकडून खिळाडूवृत्ती दाखवल्याची उदाहरण पाहायला मिळतात. मात्र त्याचवेळी क्रिकेटच्या मैदानात अनेकदा वादाची आणि टोकाच्या संघर्षाची दृष्यं पाहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार बांगलादेशमधील एका सामन्यात घडला. या सामन्यातील हा विचित्र प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
6 जण रुग्णालयात दाखल
एकीकडे भारतात वर्ल्डकप स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली असून सराव सामन्यांमध्येच संघांनी यंदाचा वर्ल्डकप चांगलाच गाजणार असल्याचे संकेत दिलेत. असं असतानाच भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये सध्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग खेळवली जात आहे. चित्रपट निर्माते मुस्ताफा कमल राझ आणि दिपांकर दिपोन या दोघांच्या संघामध्ये सामना खेळवण्यात आला. मात्र पाहता पाहता या क्रिकेट सामन्याचं रुपांतर चक्क एका डब्यूडब्ल्यूईच्या सामन्यात झालं. हा वाद एवढा भीषण होता ही मैदानात झालेल्या हाणामारीनंतर 6 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
क्रिकेटच्या मैदानाचं डब्लूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये रुपांतर
सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील या सामन्यात पंचांनी एख निर्णय चुकीचा दिल्याने दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद झाला. यावरुन सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर एका संघातील खेळाडूने दुसऱ्याच्या डोक्यात मारलं. त्यावरुन दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरु झाली आणि पाहता पाहता मैदानाचं रुपांतर डब्लूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये झाल्यासारखं वाटावं इतकी हाणामारी या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये झाली.
मैत्रीपूर्ण सामन्यात हाणामारी
"सेलिब्रिटी क्रिकेट लीगचं रुपांतर डब्ल्यूडब्ल्यूईच्या रॉयल रंबलमध्ये झालं. 6 जण जखमी झाले. ही स्पर्धा उपांत्यफेरीआधीच रद्द करण्यात आली. 30 हून अधिक वर्ष वय असलेले महिला आणि पुरुष एका चौकारावरुन आणि बाद देण्याच्या निर्णयावरुन वाद घालत आहेत आणि ते सुद्धा मैत्रीपूर्ण सामन्यात," अशा कॅप्शनसहीत सैफ अहमद या बांगलादेशी व्यक्तीने हाणामारीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
1)
2)
यापूर्वी प्रेक्षकांमध्ये झालेला असाच वाद
अशाच प्रकारचा वाद मागील महिन्यात भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुपर 4 फेरीतील सामन्यामध्ये मैदानातच हाणामारी झाली होती. कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर ही फ्री स्टाइल हाणामारी झाली होती. भारताने सामना 41 धावांनी जिंकल्यानंतर लगेच ही हाणामारी सुरु झाली होती. एका श्रीलंकन चाहत्याने पहिल्यांदा हल्ला करुन वादाला सुरुवात केली. हा वाद कशामुळे झालेला याचा खुलासा मात्र झाला नाही.