चंदीगढ: १९९८ सालच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे भारताचे माजी बॉक्सर डिंको सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे डिंको सिंग यांच्यावर सध्या कर्करोगाचेही उपचार सुरु आहेत. अशातच आता त्यांना कोरोनाने गाठले आहे. साधारण महिनाभरापूर्वी डिंको सिंग यांना कर्करोगावरील उपचारांसाठी मणीपूर येथून एअरलिफ्ट करुन दिल्लीला नेण्यात आले होते. रेडिएशन थेरपीनंतर २१ मे रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. यानंतर गेल्याच आठवडयात डिंको सिंग इंफाळला परत आले होते. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हापासून डिंको सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना खूप ताप आला. यानंतर त्यांची चाचणी केली असता डिंको सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, मणिपूरमधील अनेक बॉक्सर्स डिंको सिंग यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. 

डिंको सिंग यांना २०१७ साली यकृताचा कर्करोग झाला होता. जानेवारी महिन्यात दिल्लीच्या LLBS रुग्णालयात रेडिएशन थेरपी झाली होती. यानंतर एप्रिल महिन्यात त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना एअरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात आले होते. यादरम्यान त्यांना काविळीची बाधाही झाल्याचे समजते. 

दरम्यान, बॉक्सिंग फेडरेशनने यापूर्वीच डिंको सिंग यांच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचे जाहीर केले होते. डिंको यांना कोरोनाची लागण झाली हे दुर्दैवी आहे. मात्र, आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. डिंको सिंग हे महान बॉक्सर आहेत. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू, असे बॉक्सिंग फेडरेशनने म्हटले आहे.