#MeToo: बीसीसीआयचे निर्णायक पाऊल; राहुल जोहरींना ICC च्या बैठकीला जाण्यापासून रोखले
जोहरी यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा संबंधित महिलेचा दावा आहे.
नवी दिल्ली: लैंगिक शोषणाचा आरोप असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जोहरी यांच्याविरुद्ध संघटनेने निर्णायक पाऊल उचलले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) आगामी बैठकीला जाण्यास राहुल जोहरी यांना मनाई करण्यात आली आहे. जोहरी यांच्याऐवजी बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी या बैठकीला उपस्थित राहतील.
राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या महिलेने ट्विटवरून बीसीसीआयपर्यंत ही माहिती पोहोचवली. त्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने राहुल जोहरी यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले. त्यांना यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
याबाबत शिस्तपालन समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी म्हटले की, सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये राहुल जोहरी यांच्याविषयी चर्चा सुरु आहे. जोहरी यांच्यावर एका अनामिक महिलेने ट्विटरच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
बीसीसीआयमध्ये येण्यापूर्वी जोहरी एका मीडिया संस्थेत कार्यरत होते. त्याठिकाणी जोहरी यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा संबंधित महिलेचा दावा आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा बीसीसीआयशी थेट संबंध असल्याने तुर्तास आम्ही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे शिस्तपालन समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.