मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विकेट कीपर ऋषभ पंतला दुखापत झाली. यानंतर केएल राहुल याने पंतऐवजी विकेट कीपिंग केली. राहुलने त्याला मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. बॅटिंग आणि विकेट कीपिंगमध्ये राहुलने उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे न्यूझीलंडमध्ये टी-२० आणि वनडे सीरिजमध्येही राहुल विकेट कीपिंग करेल असे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल विकेट कीपिंग करणार असल्यामुळे ऋषभ पंतच्या टीममधलं स्थान डळमळीत झालं आहे. त्यातच आता ऋषभ पंतला दुसरा धक्का लागला आहे. पश्चिम बंगालचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा याला दिल्लीविरुद्धच्या रणजी ट्रॉफीमध्ये न खेळण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये फिट राहण्यासाठी बीसीसीआयने सहाला रणजी ट्रॉफीची मॅच खेळू नये, असं सांगितलं आहे.


ऋद्धीमान सहा मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध झालेल्या डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये खेळला होता. या टेस्ट मॅचवेळी सहाच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सहा सावरत आहे. ऋद्धीमान सहा भारताकडून ३७ टेस्ट मॅच खेळला आहे. विराट कोहलीही ऋद्धीमान सहाला सध्याचा सर्वोत्तम विकेट कीपर मानतो.


ऋषभ पंत हा भारतातला एकमेव विकेट कीपर आहे ज्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतकं केली आहेत. पण मागच्यावर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये पंतने जास्त रन केल्या नव्हत्या. यानंतर ऋद्धीमान सहाचं टीममध्ये पुनरागमन झालं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध सहाने जास्त रन केल्या नाहीत, पण शानदार विकेट कीपिंग करत त्याने उत्कृष्ट कॅच पकडले होते.


न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारत ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. २४ जानेवारीपासून टी-२० सीरिजला सुरुवात होईल. तर पहिली टेस्ट मॅच २१ फेब्रुवारीला सुरु होणार आहे. टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा व्हायची बाकी आहे, पण इशांत शर्मा दुखापतीमुळे टेस्ट सीरिज खेळू शकणार नाही. विदर्भाविरुद्धच्या रणजी ट्रॉफी मॅचमध्ये इशांत शर्माच्या पायाला दुखापत झाली. ६ आठवडे इशांत शर्मा क्रिकेट खेळू शकणार नाही. इशांत शर्मा आणि ऋद्धीमान सहा हे फक्त टेस्ट मॅच खेळत आहेत.