मुंबई : बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसोबतच्या वर्षभरासाठीच्या कराराची घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या या करारामध्ये धोनीला धक्का देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या नव्या करारबद्ध खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश नाही. बीसीसीआयने उचलेल्या या पावलामुळे धोनी आता टीम इंडियाकडून खेळू शकणार का नाही? धोनी युग संपलं? धोनीला निवृत्ती घेण्यासाठी शेवटचा सामना मिळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण आता बीसीसीआयने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करारबद्ध करणं आणि धोनीच्या भविष्याचा काहीही संबंध नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. धोनी चांगली कामगिरी करुन पुन्हा एकदा भारतीय टीममध्ये येऊ शकतो. करार करणं म्हणजे भारताकडून खेळणं असा त्याचा अर्थ होत नाही. भारताकडून नियमित खेळणाऱ्या खेळाडूंसोबत करार करण्यात आला आहे, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.


बीसीसीआयकडून खेळाडूंच्या नव्या कराराची घोषणा


धोनी हा वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शेवटचा खेळला होता. जुलै महिन्यात ही मॅच झाली होती. यानंतर धोनी भारताकडून खेळला नाही, त्यामुळे त्याचं नाव करारबद्ध खेळाडूंमध्ये नाही, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. बीसीसीआयने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंत खेळाडूंशी करार केला आहे.


धोनी आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, तसंच इतर विकेट कीपरचा फॉर्म कसा आहे, यावर धोनीची टी-२० वर्ल्ड कपमध्ये निवड होईल का नाही, हे ठरवलं जाईल, असं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. आयपीएल मोठी स्पर्धा आहे. आयपीएल संपल्यानंतर टी-२० वर्ल्ड कपमध्ये कोण खेळणार, हे स्पष्ट होईल, असं शास्त्रींनी सांगितलं होतं. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.