बीसीसीआयकडून खेळाडूंच्या नव्या कराराची घोषणा, धोनीला धक्का

बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंच्या नव्या कराराची घोषणा केली आहे. 

Updated: Jan 16, 2020, 02:23 PM IST
बीसीसीआयकडून खेळाडूंच्या नव्या कराराची घोषणा, धोनीला धक्का title=

मुंबई : बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंच्या नव्या कराराची घोषणा केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे धोनीचा या करारबद्ध खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. धोनीने वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर एकही मॅच खेळलेली नाही. दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू आणि खलील अहमद यांचाही करारबद्ध खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंतचा बीसीसीआय आणि खेळाडूंचा हा करार आहे. नवदीप सैनी, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांची या करारामध्ये वर्णी लागली आहे. बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंचं ग्रेड ए+, ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी असं वर्गीकरण केलं आहे. ए+ खेळाडूंना ७ कोटी रुपये, ए ग्रेडमधल्या खेळाडूंना ५ कोटी, ग्रेड बीमधल्या खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि ग्रेड सीमधल्या खेळाडूंना १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

बीसीसीआयने मागच्यावर्षी प्रमाणेच यंदाही ग्रेड आणि खेळाडूंना देण्यात येणारी रक्कम सारखी ठेवलेली आहे. ए+ ग्रेडमध्ये मागच्यावेळी असलेले ३ खेळाडू कायम आहेत. तर केएल राहुलचं बी ग्रेडवरून ए ग्रेडवर प्रमोशन झालेलं आहे. तर ऋद्धीमान सहा सी ग्रेडवरून बी ग्रेडमध्ये आलेला आहे.

ए+ ग्रेड (७ कोटी रुपये)

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

ए ग्रेड (५ कोटी रुपये)

आर अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत

बी ग्रेड (३ कोटी रुपये)

ऋद्धीमान सहा, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल,

सी ग्रेड (१ कोटी रुपये)

केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर

बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंना या रकमेसोबतच प्रत्येक मॅचसाठी वेगळं मानधन आणि बोनसही देण्यात येतो. एकूण २७ खेळाडूंसोबत बीसीसीआयने या वर्षासाठीचा करार केला आहे.