म्हणून आयपीएल लिलाव करणार नाही, रिचर्ड मेडलींचं स्पष्टीकरण
२०१९ सालच्या आयपीएलसाठी जयपूरमध्ये १८ डिसेंबरला लिलाव होणार आहे.
मुंबई : २०१९ सालच्या आयपीएलसाठी जयपूरमध्ये १८ डिसेंबरला लिलाव होणार आहे. बीसीसीआयनं सोमवारी याबद्दल घोषणा केली आहे. पण या लिलावामध्ये प्रत्येक वर्षी दिसणारे रिचर्ड मेडले यावेळी दिसणार नाही. त्यांच्याऐवजी ही जबाबदारी ह्यू ऍडमिडेस यांना सोपवण्यात आली आहे. ऍडमिडेस यांना लिलाव करणारी कंपनी क्रिस्टीमध्ये ३० वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. रिचर्ड मेडली या लिलावात का दिसणार नाहीत असा प्रश्न उपस्थित झाला होता. या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द त्यांनी स्वत:च दिलं आहे.
मी आयपीएल लिलावात दिसणार नाही हे समजल्यानंतर तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचे आभार. लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय माझा नाही. बीसीसीआयनं मला लिलाव करण्यासाठी बोलावलं नाही. क्रिकेटच्या भाषेत मला काढून टाकण्यात आलं, असं ट्विट रिचर्ड मेडलींनी केलं आहे.
७० खेळाडूंच्या लिलावासाठी १००३ अर्ज
७० खेळाडूंच्या लिलावासाठी यावेळी तब्बल १००३ खेळाडूंनी अर्ज केले आहेत. यामध्ये एकूण २३२ परदेशी आणि उरलेले भारतीय खेळाडू आहेत. नाव नोंदवलेल्या १००३ खेळाडूंपैकी ८०० खेळाडूंनी एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही. या ८०० पैकी ७४६ खेळाडू भारताचे आहेत.
सर्वाधिक परदेशी खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे
आयपीएलच्या लिलावासाठी नाव नोंदवण्यात आलेले सर्वाधिक खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या ५९ खेळाडूंनी, ऑस्ट्रेलियाच्या ३५, वेस्ट इंडिजच्या ३३, श्रीलंकेच्या २८, अफगाणिस्तानच्या २७, न्यूझीलंडच्या १७, इंग्लंडच्या १४ आणि बांगलादेशच्या १० खेळाडूंनी लिलावासाठी त्यांचं नाव नोंदवलं आहे. या यादीमध्ये अमेरिका, हाँगकाँग आणि आयर्लंडच्या प्रत्येकी १-१ खेळाडूचा समावेश आहे.
टीमनी ७१ खेळाडू सोडले
आयपीएलच्या ८ टीमनी एकूण ७१ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यातल्या दिल्लीच्या टीमनं सर्वाधिक १३ खेळाडू सोडून दिले. तर चेन्नईनं सगळ्यात कमी ३ खेळाडूंना सोडलं.
८ टीमकडे लिलावामध्ये बोली लावण्यासाठी १४५ कोटी २५ लाख रुपयांची मर्यादा आहे. यावर्षी आयपीएलच्या लिलावाची जागाही बदलण्यात आली आहे. मागच्यावर्षी बंगळुरूमध्ये लिलाव झाला होता.
दिल्लीनं सर्वाधिक खेळाडू सोडले
मागच्या महिन्यामध्ये आयपीएलच्या टीमनी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. दिल्लीच्या टीमनं सर्वाधिक १३ खेळाडू बाहेर केले. तर गतविजेत्या चेन्नईनं ३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. चेन्नईनं सगळ्यात कमी खेळाडूंना बाहेर केलं. आयपीएलच्या एकूण ८ टीमनी मिळून ७१ खेळाडू बाहेर केले. हे खेळाडू आता कोणत्याच टीममध्ये नसल्यामुळे ते लिलावात सामील होऊ शकतात. २०१९ साली आयपीएलचा १२वा मोसम खेळवण्यात येणार आहे.
युवराज, गंभीरही बाहेर
आयपीएलच्या टीमनी काही मोठ्या खेळाडूंनाही बाहेर केलं आहे. यामध्ये पंजाबच्या युवराज सिंग आणि दिल्लीच्या गौतम गंभीरचा समावेश आहे. आता गौतम गंभीरनं मात्र सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यानं लिलावासाठी अर्ज केलेला नाही. २०१८ साली लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सगळ्यात महागडा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. राजस्थाननं उनाडकटला ११.५० कोटी रुपये देऊन विकत घेतलं. पण यावर्षी मात्र उनाडकटला राजस्थाननं बाहेर काढलं.
हैदराबादनं विकेट कीपर ऋद्धीमान सहा आणि वेस्ट इंडिजचा टी-२० टीमचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटला टीम बाहेर केलं. मुंबईच्या टीमनं जेपी ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजुर रहमान या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला.
देशाबाहेर होणार आयपीएल?
२०१९ सालचं आयपीएल आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी आहेत. त्यामुळे आयपीएलचा काही भाग किंवा संपूर्ण आयपीएल भारताबाहेर घेतलं जाऊ शकतं. मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांवेळीही अशाचप्रकारे आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आलं. २०१४ सालच्या निवडणुकीवेळी अर्धी आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली आणि उरलेले आयपीएलचे सामने पुन्हा भारतात खेळवले गेले. २००९ साली संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती.