दुहेरी शतक झळकावणारा कोहली वनडे आणि टी-२० सीरिजमधून बाहेर
भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवल्या जात असलेल्या तीन कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा विराट कोहली मालिकेतील पुढच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीये.
नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवल्या जात असलेल्या तीन कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा विराट कोहली मालिकेतील पुढच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीये.
विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी आराम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विराटच्या जागी रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जाऊ शकते. याशिवाय कोहली दोन डिसेंबरपासून सुरु होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही खेळणार नसेल तर अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवले जाऊ शकते.
श्रीलंकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
विराट कोहली आयपीएलनंतर सतत क्रिकेट खेळतोय. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ लगेचच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे कोहलीला पुरेशी विश्रांतीही मिळालेली नाहीये. याच कारणामुळे बीसीसीआयने मालिकेतील पुढील सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज संघ निवड
आज निवड समितीकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्ट्या पाहता जसप्रीत बुमरहाला स्थान मिळू शकते. तसेच चार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांचीही निवड निश्चित आहे. दिल्लीचा नवदीप सैनीही संघातील एक नवा चेहरा असू शकतो.