नवी दिल्ली : बीसीसीआयनं आयपीएल यशस्वी आणि लोकप्रिय केलं पण त्यांनी टेस्ट क्रिकेटचं मार्केटिंग केलं नाही, अशी प्रतिक्रिया गौतम गंभीरनं दिली आहे. बीसीसीआयचे सीओए विनोद राय आणि सीईओ राहुल झोरी यांच्यापुढेच गंभीरनं हे रोखठोक मत मांडलं. बीसीसीआयनं वनडे आणि टी-20 क्रिकेटला ज्या पद्धतीनं प्रसिद्धी दिली तशी प्रसिद्धी टेस्ट क्रिकेटला दिली नसल्याचं गंभीर म्हणाला. २०११ साली ईडन गार्डनच्या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मॅच सुरु होती. पहिल्या दिवशी भारत बॅटिंग करत असताना फक्त एक हजार प्रेक्षक मैदानात होते, अशी खंत गंभीरनं व्यक्त केली. सचिन, सेहवाग, तेंडुलकर, लक्ष्मण यांच्यासारखे दिग्गज मैदानात खेळत असताना फक्त एक हजार प्रेक्षक मैदानात होते, असं वक्तव्य गंभीरनं केलं. क्रिकेट इतिहासकार बोरिया मुजुमदार यांच्या 'इलेव्हन गॉड्स अॅण्ड बिलियन इंडियन्स' या पुस्तक प्रकाशनामध्ये गंभीरनं त्याचं मतं मांडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या शहरांमध्ये टेस्ट क्रिकेट खेळवण्याचा सल्ला हरभजननं दिला होता. पण यामुळे फारसा फायदा होणार नाही. क्रिकेटमध्ये त्यांनी कुठेतरी गोंधळ घातला आहे. टी-20 आणि वनडे क्रिकेट कमी करण्याची गरज आहे, असं गंभीरला वाटतंय. टेस्ट मॅचआधी वनडे आणि टी-20 क्रिकेट खेळल्यामुळे थोडीच मदत होईल, असं गंभीर म्हणालाय.


भारताच्या इंग्लंड दौऱ्याला २७ जूनपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारत पहिले ३ टी-20, ३ वनडे आणि मग ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. लाल बॉलनी क्रिकेट खेळणं आणि पांढऱ्या बॉलनं क्रिकेट खेळणं वेगळं आहे. ३ टी-20 आणि ३ वनडे खेळल्यामुळे टेस्ट क्रिकेटसाठी तुमचा किती सराव झाला आहे हे सांगता येऊ शकत नाही, असं वक्तव्य गंभीरनं केलं आहे.