आकाशातून असं दिसतं जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम
जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये बांधून तयार आहे.
अहमदाबाद : जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये बांधून तयार आहे. बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरुन आकाशातून घेतलेला या स्टेडियमचा फोटो ट्विट केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ फेब्रुवारीला या स्टेडियमचं उद्घाटन होईल.
अहमदाबादमधलं मोटेरा म्हणजेच सरदार पटेल स्टेडियम हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्डेयियम असणार आहे. या स्टेडियममध्ये एकावेळी १ लाख १० हजार प्रेक्षक मॅचचा आनंद घेऊ शकतात. याआधी ऑस्ट्रेलियातलं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) हे सगळ्यात मोठं स्टेडियम होतं. मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षकसंख्या १ लाखाच्या आसपास आहे.
जानेवारी २०१८ मध्ये या स्टेडियमचं भूमीपूजन झालं होतं. गुजरात क्रिकेट असोसिएशननं लार्सन ऍण्ड टर्बो (एल ऍण्ड टी) या कंपनीला हे स्टेडियम बांधण्याचं कंत्राट दिलं. जगप्रसिद्ध आर्किटेक्चर फर्म एमएस पॉप्युलसनं या स्टेडियमचं डिझाईन केलं आहे. याच फर्मनं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचंही डिझाईन केलं होतं.
हे स्टेडियम उभारण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हे नवं क्रिकेट स्टेडियम ६३ एकर परिसरात पसरलं आहे. या स्टेडियममध्ये ५० रूम असलेलं क्लब हाऊस, ७६ कॉरपोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रूम, क्रिकेटपटूंसाठी ३ प्रॅक्टिस ग्राऊंड, इनडोर क्रिकेट अॅकेडमी, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, ३ हजार चारचाकी आणि १० हजार दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था असेल.