ICC च्या `त्या` नियमावरुन गोंधळ, BCCI ने आयपीएलमधून हटवला
सॉफ्ट सिग्नलच्या नियमामुळे बराच गोंधळ
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL 14) चा 14 वा सिझन सुरू होण्यास आता काही दिवस शिल्लक आहेत. यंदाचा आयपीएल 9 एप्रिलपासून खेळला जाणार आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2021 सुरू होण्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सॉफ्ट सिग्नल नियम हटविला जाईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. भारत-इंग्लंड दरम्यान झालेल्या सिरीजमध्ये सॉफ्ट सिग्नलच्या नियमामुळे बराच गोंधळ उडालेला दिसला. त्यानंतर बीसीसीआय या निर्णयापर्यंत पोहोचली.
सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय?
मैदानातील अम्पायर थर्ड अम्पायरच्या निर्णयाची वाट पाहतात तेव्हा स्वत: एक सॉफ्ट सिग्नल देतात. आपला निर्णय सॉफ्ट सिग्नलने सांगून थर्ड अम्पायरला ते सुनिश्चित करायला सांगतात. जर थर्ड अम्पायरकडे भक्कम पुरावा असेल तरच तो मैदानातील अम्पायरचा निर्णय चुकीचा ठरवू शकतो. पण आयपीएलमध्ये आता हे घडणार नाही.
आयपीएलमध्ये यापुढे सॉफ्ट सिग्नल हा प्रकार राहणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. थर्ड अम्पायरकडे निर्णय मागताना मैदानातील अम्पायर सॉफ्ट सिग्नल देऊ शकणार नाहीत. यापूर्वी थर्ड अम्पायरकडे निर्णय मागण्यापुर्वी सॉफ्ट सिग्नल दिला जायचा. या निर्णयासोबत आणखी एका नियमात बदल झालाय.
मैदानावरील अंपायरने दिलेला नो बॉल आणि शॉर्ट रनच्या निर्णयातही थर्ड अम्पायरला बदल करता येणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी -२० मालिकेच्या चौथ्या सामन्यादरम्यान, सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)सीमेजवळ डेव्हिड मालनचा (Dawid Malan) झेल टिपला. हा निर्णय थर्ड अम्पायरकडे गेला. परंतु त्याआधी मैदानातील अम्पायरने त्याला सॉफ्ट सिग्नलमध्ये आऊट केले.
चेंडू जमिनीवर असल्याचे रिप्लेमध्ये दिसले पण तरीही थर्ड अम्पायरने बॅट्समनला आऊट दिले. यानंतर या नियमावर चहुबाजूंनी टीका झाली. अगदी टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहलीने देखील हा नियम बदलण्यास सांगितले आहे.