`ही असली नाटकं सहन करणार नाही,` जय शाह यांनी भारतीय क्रिकेटपटूंना खडसावलं; म्हणाले `विराट जर...`
बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप संघाचा कर्णधार असेल असं स्पष्ट केलं आहे. पण यावेळी त्यांनी विराट कोहली (Virat ohli) वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबत मात्र काही भाष्य केलं नाही.
बीसीसीआयशी करारबद्ध असणाऱ्या खेळाडूंना यापुढे स्थानिक क्रिकेट खेळणं अनिवार्य असणार आहे. यासाठी बीसीसीआय कोणत्याही प्रकारची कारणं ऐकून घेणार नाही असा इशारा सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी दिला आहे. जय शाह यांनी राजकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जर एखाद्या खेळाडूने संघ व्यवस्थापनाने दिलेल्या सूचनांचं पालन केलं नाही तर निवड समितीच्या अध्यक्षांना निर्णय घेण्याची मुभा असेल असं स्पष्ट केलं.
बीसीसीआय आयपीएलमध्ये खेळण्यास इच्छुक असलेल्या भारतीय खेळाडूंना आधी रणजी ट्रॉफीत खेळणं बंधनकारक असेल अशी चर्चा होती. "मी आधीच फोनवरुन कळवलं आहे आणि यासंबंधी पत्रही लिहिणार आहे. ज्यात सांगितलं असेल की, जर तुमचे प्रशिक्षक, कर्णधार स्थानिक क्रिकेट खेळण्यास सांगत असतील तर तुम्हाला खेळावं लागेल", असं जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र, हे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मार्गदर्शनानुसार होणार असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं. "आम्हाला एनसीएकडून ज्याप्रकारे सल्ला मिळत आहे त्याप्रमाणे कारवाई केली जात आहे. म्हणजेच जर त्यांनी एखादा खेळाडू खेळण्यास सक्षम नाही असं सांगितलं तर आम्ही त्याच्यावर जबरदस्ती करणार नाही," असं जय शाह म्हणाले आहेत.
"हे बंधन तरुण आणि फिट खेळाडूंसाठी आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची नाटकं सहन करणार नाही. करारबद्ध असणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी हा संदेश आहे," असं जय शाह यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, "प्रत्येकाला खेळावं लागणार आहे. अन्यथा मला निवड समितीच्या अध्यक्षांनी काही गोष्टी सुचवल्या असून मी त्यांनी निर्णय घेण्याची पूर्ण मुभा दिली आहे".
दरम्यान यावेळी त्यांनी जर काही खेळाडूंना वैयक्तिक कारणासाठी सुट्टी हवी असेल तर त्यांना पाठिंबा देणं गरजेचं असल्याचंही म्हटलं. विराट कोहलीने सध्या वैयक्तिक कारणामुळे विश्रांती घेतली असून इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकला आहे. "जर एखादा खेळाडू 15 वर्षात पहिल्यांदा विश्रांती मागत असेल तर त्याचा विचार करायला हवा. विराट विनाकारण विश्रांती मागणारा खेळाडू नाही. आम्ही खेळाडूंना पाठिंबा देत, विश्वास दाखवला पाहिजे," असं जय शाह म्हणाले.
पण जय शाह यांनी यावेळी विराट कोहली टी-20 वर्ल्डकप खेळणार की नाही याबद्दल अतिरिक्त माहिती दिली नाही. एकीकडे त्यांनी कार्यक्रमात रोहित शर्माच टी-20 वर्ल्डकपचा कर्णधार असेल असं स्पष्टक केलं आहे, पण विराट कोहलीबद्दल अतिरिक्त माहिती दिली नाही. मोहम्मद शमीही सध्या जखमी असून दुखापीतमधून सावरत आहे. जय शाह यांनी मोहम्मद शमी जेव्हा कधी फिट होईल तेव्हा माहिती दिली जाईल असं सांगितलं आहे.