Indian Cricket Team: सध्या घरगुती क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा आणि तुफान फॉर्ममध्ये असलेला खेळाडू म्हणून सरफराज खान (Sarfaraz Khan) चांगलाच चर्चेत आहे. सरफराजचा इथपर्यंतचा प्रवास फारच रंजक राहिला आहे. मात्र सातत्याने चांगली कामगिरी करुनही सरफराजला भारतीय संघात (Team India) स्थान मिळालेलं नाही. त्यामुळेच सरफराजबरोबर असं का झालं, नेमकं काय चुकलं त्याचं याबद्दल क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Ind vs Aus Test) आगामी कसोटी मालिकेसाठी (border gavaskar trophy) सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघांची घोषणा झाली आहे. या संघामध्ये ईशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांची निवड झाली आहे. मात्र घरगुती क्रिकेटमधील नवी रन मशीन अशी ओळख मिळवलेल्या सरफराजचा या संघात समावेश नाही. सरफराजला चांगल्या कामगिरीनंतरही वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेक शतकांबरोबरच सातत्याने धावा करणाऱ्या या खेळाडूवर अन्याय झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळापासून सोशल मीडियावरही दिसून येत आहे. सरफराजला का डावलण्यात आलं याबद्दल अजूनही क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे. नेमकं असं काय घडलं की आकडेवारी सरफराजच्या बाजूने असूनही त्याला संधी देण्यात आली नाही असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडला आहे. असं असतानाच आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने पहिल्यांदाच यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे.


स्पोर्टस्टारवर राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्य श्रीधरन शरथ यांना सरफराजसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी सरफराजला निवड समितीने का डावललं यामागील कारणं सांगितलं. सध्याच्या संघाबद्दल बोलताना शरथ यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारासारख्या दिग्गज खेळाडूंबरोबरच नव्या खेळाडूंचंही तोंडभरुन कौतुक केलं. "कोहली आजही मॅच विनर खेळाडू आहे. चेतेश्वर पुजारा फलंदाजीमध्ये स्थैर्य आणतो. रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे. श्रेयस अय्यर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. शुभमन गिल आणि के. एल. राहुल यांच्यामध्ये चांगल्या धावा जमवण्याची क्षमता आहे," असं शरथ म्हणाले.


शरथ यांना सरफराजचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हा तरुण फलंदाज संघाबाहेर असण्याची दोन मुख्य कारणं म्हणजे नियोजन आणि संतुलन हे असल्याचं सांगितलं. "तो निश्चितपणे आमच्या रडावर आहे. योग्य वेळ आल्यानंतर त्याला त्याच्या हक्कची जागा मिळेल. संघ निवडताना आम्ही नियोजन आणि संतुलन यासारख्या गोष्टींचा विचार करावा लागतो," असं शरथ म्हणाले. 


निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. उरलेल्या दोन सामन्यांसाठी योग्य वेळी संघ जाहीर केला जाईल. सरफराजला सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी निवडण्यात आलेलं नसलं तरी बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याला संधी दिली जाईल अशी चर्चा आहे.