मुंबई : टी20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियावर साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढावली. भारताच्या या खराब कामगिरीवर भारतीय क्रिकेट बोर्डाने सवाल उपस्थित केले आहेत. टीम इंडियाच्या कामगिरीबाबत बीसीसीआय कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे. न्यूझीलंडचा क्रिकेट संघ या महिन्यात भारतात येत असून मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा होऊ शकते. दोन्ही संघ तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. 


या मालिकेतून अष्टपैलू हार्दिक पांड्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनूसार बीसीसीआय हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर नाखुश आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावर बीसीसीआयने प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच निवड समिती आणि टीम व्यवस्थापनाकडे याचं उत्तर मागितलं आहे. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असताना त्याची संघात का निवड करण्यात आली, त्याचबरोबर त्याला अंतिम अकरामध्ये का खेळवण्यात आलं असे प्रश्न क्रिकेट बोर्डाने विचारले आहेत.


आयपीएल 2021 दरम्यान हार्दिकला दुखापत झाल्याचं कळल्यावर त्याला भारतीय संघात सहभागी करण्याऐवजी नॅशनल क्रिकेट अकॅडमीत (NCA) का नाही पाठवण्यात आलं, अशी विचारणा क्रिकेट बोर्डातर्फे केली जाऊ शकते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखपतग्रस्त असतानाही निवड समिती आणि टीम व्यवस्थापन समितीने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता.


या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नव्हती, त्यामुळे भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजाची कमतरता जाणवली. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला. या निर्णयांवर बीसीसीआय नाराज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या क्रिकेट मालिकेत हार्दिक पांड्याला डच्चू मिळू शकतो. फिटनेससाठी त्याला नॅशनल क्रिकेट अकॅडमीत पाठवलं जाऊ शकतं.


सूत्रांच्या माहितीनुसार निवड समितीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. हार्दिकला पर्यायी खेळाडूची चाचपणी करण्यास सांगण्यात आलं आहे.


वरुण चक्रवर्तीवरही बोर्ड नाराज


हार्दिक पांड्याबरोबरच क्रिकेट बोर्डाने वरुण चक्रवर्तीच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित केला आहे. विश्वचषकापूर्वी वरुण चक्रवर्तीही दुखापतग्रस्त होता. असं असताना यजुवेंद्र चहलची संघात निवड का करण्यात आली नाही, असा सवाल क्रिकेट बोर्ड विचारु शकतं. 


मीडिया रिपोर्टनुसार हार्दिकला एनसीएत जाण्यास सांगण्यात आलं होतं, पण हार्दिकने त्याला विरोध केला. यामुळे क्रिकेट बोर्ड नाराज आहे. आता विश्वचषक स्पर्धेनंतर हार्दिक पांड्याला मोठ्या सुटीवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. आता डिसेंबर-जानेवारीत होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी हार्दिकला संघात सहभागी करुन घेतलं जाणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


व्यंकटेश अय्यरला संधी मिळणार?


हार्दिक पांड्याला पर्याय खेळाडू म्हणून कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार व्यंकटेश अय्यरकडे पाहिलं जात आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत व्यंकटेश अय्यरच्या कामगिरीवर निवड समितीला लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या क्रिकेट मालिकेत व्यंकटेश अय्यरला संधी मिळू शकते. 


न्यूझीलंडविरुद्धच्या क्रिकेट मालिकेत असा असू शकत भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, हर्षल पटेल, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, चेतन सकारिया, श्रेयस अय्यर, राहुल चाहर, टी नटराजन, मयंक अग्रवाल