Pakistani Cricketer Retires Before T20 World Cup: यंदाच्या वर्षी होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपमुळे हे वर्ष पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी फार महत्त्वाचं आहे. यंदाच्या वर्षी पुरुषांच्या टी-20 वर्ल्डकपबरोबरच महिलाची टी-20 वर्ल्डकप स्पर्धाही भरवली जाणार नाही. जून महिन्यामध्ये पुरुषांची टी-20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. तर त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे पाकिस्तानचा पुरुष आणि महिला संघ या स्पर्धांच्या तयारीत व्यस्त आहे. त्यातच मागील बराच काळ मैदानापासून दूर असलेल्या खेळाडूंना या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. असं असतानाच पाकिस्तानच्या एका महिला क्रिकेटपटूने तडकाफडकी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानची माजी कर्णधार असलेल्या बिस्माह मारूफने तत्काळ प्रभावाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. वर्ल्डकपसारखी मोठी स्पर्धा असलेल्या वर्षामध्येच बिस्माहने निवृत्ती जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


कशी आहे या खेळाडूची कारकिर्द?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2006 साली बिस्माह मारूफ पहिल्यांदा पाकिस्तानी संघासाठी अंतरराष्ट्रीय सामना खेळली होती. आतापर्यंत बिस्माह मारूफ पाकिस्तानसाठी 276 सामने खेळली आहे. तिने अंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 6262 धावा केल्या आहेत. यामध्ये एकूण 33 अर्धशतकांचा समावेश आहे. बिस्माह मारूफ ही उत्तम गोलंदाजही आहे. तिने गोलंदाजीच्या माध्यमातूनही संघासाठी योगदान दिलं असून तिच्या नावावर एकूण 80 विकेट्स आहेत. कर्णधार म्हणून बिस्माह मारूफने एकूण 96 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. यामध्ये बिस्माह मारूफने 2020 आणि 2023 मध्ये आयसीसीच्या महिला टी-20 वर्ल्डकपबरोबरच 2022 च्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्येही संघाची धूरा संभाळली. पाकिस्तानला यापैकी एकाही स्पर्धेत म्हणावं तस यश मिळवता आलं नाही.


निवृत्तीसंदर्भात काय म्हटलं


मला सर्वाधिक प्रिय असलेल्या खेळातून मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं बिस्माह मारूफने निवृत्ती संदेशात म्हटलं आहे. माझा आतापर्यंतचा प्रवास हा आव्हानात्मक, जय-पराजयाबरोबरच कधीही विसरता येणार नाही अशा आठवणींनी भरलेला राहिला आहे. मी माझ्या कुटुंबाचे आभार मानते. माझ्या कुटुंबाने अगदी सुरुवातीपासून मला साथ दिली. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि मला माझी प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या पाकिस्तीनी क्रिकेट बोर्डाचेही मी आभार मानते. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने मला दिलेला पाठिंबा खरोखरच फार मोलाचा होता. माझ्यासाठी पीसीबीने पाहिल्यांदा पालकत्व धोरण लागू केलं. त्यामुळे मला आई होण्याबरोबरच सर्वोत्त स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी मला सक्षम बनवलं, असं बिस्माह मारूफ म्हणाली.



चाहत्यांचेही मानले आभार


माझ्या संपूर्ण करिअरमध्ये मला समर्थन देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानते. जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे मी देशाचं प्रतिनिधित्व केलं तेव्हा चाहत्यांनी माझी पाठराखण केली. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. सर्वात शेवटी मी माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. हे सहकारी आता माझ्यासाठी एका कुटुंबासारखे झाले आहेत. मैदानात आणि मैदानाबाहेर जे काही क्षण आम्ही जगलो आणि एकत्र अनुभवले ते मी कायम लक्षात ठेवेन, असंही बिस्माह मारूफने आपल्या निवृत्ती संदेशात म्हटलं आहे.