विराटला भारत रत्न द्या, क्रीडा संघटनेची पंतप्रधानांकडे मागणी
भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला भारत रत्न देण्यात यावं अशी मागणी ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (एआयजीएफ)नं केली आहे.
नवी दिल्ली : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला भारत रत्न देण्यात यावं अशी मागणी ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (एआयजीएफ)नं केली आहे. याबद्दलचं पत्र एआयजीएफनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. क्रिकेट या खेळाला देशात सर्वाधिक प्रेम केलं जातं. विराट कोहलीनं मागच्या अनेक वर्षांपासून सर्वोत्तम कामगिरी करून देशवासियांची मनं जिंकली आहेत. जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचवण्यात विराटचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्याला भारत रत्न द्यावं, असं क्रीडा संघटनेनं या पत्रात म्हणलं आहे.
सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. ज्याला भारत रत्न देऊन गौरवण्यात आलं आहे. विराटनं ७३ टेस्ट मॅचमध्ये ५४.५७ च्या सरासरीनं ६,३३१ रन केले आहेत. तर २१६ वनडेमध्ये कोहलीनं ५९.८३ च्या सरासरीनं १०,२३२ रन केलेत. ६२ टी-२०मध्ये ४८.८८ च्या सरासरीनं कोहलीच्या नावावर २,१०२ रन आहेत. विराटनं वनडेमध्ये ३८ शतकं तर टेस्टमध्ये २४ शतकं केली आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कोहलीनं सर्वात जलद १० हजार रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला. विराटनं २०५ इनिंगमध्ये १० हजार रन केले. याआधी हे रेकॉर्ड सचिनच्या नावावर होतं. सचिननं १० हजार रन २५९ इनिंगमध्ये पूर्ण केले होते.
२००८ साली मलेशियात झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला होता. विराट कोहली त्या टीमचा कर्णधार होता. या वर्ल्ड कपनंतर विराट कोहली प्रकाश झोतात आला. यानंतर लगेचच १९ व्या वर्षी विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन केलं. श्रीलंकेविरुद्ध विराट त्याची पहिली वनडे खेळला होता.