VIDEO: विकेट घेतल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजाचं `कोरोना स्टाईल` सेलिब्रेशन, अनोख्या स्टाईलची चर्चा
कोरोना स्टाईल सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
Cricket News : जभरात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे कोरोना (Corona). कोरोनाने पुन्हा एकदा जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना टाळण्यासाठी हात धुवा, मास्क वापरा असं आवाहन केलं जातं. कोरोनाच्या याच आवाहनाला पाकिस्तानी गोलंदाजाने आपली स्टाईल बनवली आहे.
पाकिस्तानचा बॉलर हॅरिस रौफ (Haris Rauf) याने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करण्याचा एक नवीन प्रकार केला आहे. त्याच्या या स्टाईलची सध्या जोरदार चर्चा आहे. विकेट घेतल्यानंतर हॅरिस रौफने सॅनिटाईजने हात स्वच्छ करण्याची नक्कल केली आणि त्यानंतर खिशातून मास्क काढून घातला. रौफची ही स्टाईल सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
बिग बॅश सामन्यात रौफचा अनोखा अंदाज
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये पाक गोलंदाज हॅरिस रौफची हे कोरोना स्टाईल सेलिब्रेशन पाहायला मिळालं. मेलबर्न स्टार्सचा गोलंदाज हॅरिस रौफने पर्थ स्कॉचर्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजाची विकेट घेतली तेव्हा त्याने पहिल्यांदाच आपल्या सेलिब्रेशनचा अनोखा अंदाज दाखवला. बाद होणारा फलंदाज पर्थ स्कॉचर्सचा सलामीवीर कुर्टिस पॅटरसन होता, तो हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षकाच्या हाती झेलबाद झाला.
हॅरिस रौफने घेतल्या २ विकेट
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्स संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 196 धावा केल्या. यष्टिरक्षक लॉरी इव्हानने 46 चेंडूत 5 षटकारांसह 69 धावा केल्या. मेलबर्न स्टार्सकडून हॅरिस रौफने 2 विकेट घेतल्या. त्याने 4 षटकात 38 धावा दिल्या.