सि़डनी : न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रॅण्डन मॅक्कलमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. पण टी-२० लीगमध्ये मॅक्कलम धुमाकूळ घालतोय. ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीग(बीबीएल)मध्ये मॅक्कलमच्या चपळतेचा आणखी एक नमुना पाहायला मिळाला. बीबीएलमध्ये मॅक्कलम ब्रिस्बेन हिट या संघाकडून खेळतोय. सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात मॅक्कलम सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी त्यानं अफलातून कामगिरी केली. मॅक्कलमला कॅच पकडता आला नसला तरी त्याच्या कामगिरीचं सोशल नेटवर्किंगवर कौतुक होतंय. या मॅचमध्ये मॅक्कलमच्या क्षेत्ररक्षणाचीच चर्चा झाली असली, तरी सिडनी सिक्सर्सनं ब्रिस्बेन हिटचा ७९ धावांनी पराभव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडनी सिक्सर्सची बॅटिंग सुरु असताना १६व्या ओव्हरमध्ये मॅक्कलमनं सीमारेषेवर अफलातून क्षेत्ररक्षण केलं. ४६ बॉलमध्ये ७५ धावा करणाऱ्या जेम्स व्हिन्सनं बॉल हवेत टोलवला. त्यावेळी सीमारेषेवर उभ्या असलेल्या मॅक्कलमनं कॅच पकडला, पण कॅच पकडत असताना मॅक्कलमचं नियंत्रण सुटलं आणि तो सीमारेषेबाहेर फेकला गेला. सीमारेषेबाहेर हवेतच मॅक्कलमनं बॉल पुन्हा मैदानात टाकला.


दुसऱ्यावेळी जेव्हा बॉल हातात गेला तेव्हा मॅक्कलम सीमारेषेबाहेर पण हवेत होता. त्याच्या शरिराचा कोणताच भाग मैदानाला स्पर्श करत नव्हता, त्यामुळे अंपायरनी फोर किंवा सिक्स दिली नाही. पण जुने नियम सध्या लागू असते तर मात्र अंपायरना हा बॉल सिक्स द्यावा लागला असता. ऑक्टोबर २०१३ मध्ये क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले.



या नियमानुसार क्षेत्ररक्षकाचा बॉलशी पहिला स्पर्श सीमारेषेच्या आत झाला पाहिजे. क्षेत्ररक्षकानं हवेतच बॉल पकडला तर आधी तो खेळाडू सीमारेषेच्या आत असावा. म्हणजेच क्षेत्ररक्षण करताना खेळाडूचा बॉलला पहिला स्पर्श सीमारेषेच्या आत झाला आणि नियंत्रण सुटल्यामुळे तो क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर गेला असेल, तर त्यानं हवेत असतानाच मैदानात बॉल टाकावा. सीमारेषेबाहेरून क्षेत्ररक्षक पुन्हा सीमारेषेच्या आत आला आणि त्यानं कॅच पकडला तर तो कॅच ग्राह्य धरला जाईल. 



बीबीएलमध्ये याआधीही मॅक्कलमनं त्याच्या चपळ क्षेत्ररक्षणाची झलक दाखवली होती. पर्थ स्कॉचर्सविरुद्धच्या मॅचमध्येही त्यानं अशाच प्रकारचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळीही मॅक्कलमला कॅच पकडता आला नव्हता. या शतकात सोडला गेलेला सर्वोत्तम कॅच म्हणून या कॅचची चर्चा सोशल मीडियामध्ये झाली होती. बीबीएलमध्ये मॅक्कलम त्याच्या क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवत असला तरी त्याला बॅटिंगमध्ये फारशी चमक दाखवता आलेली नाही. आयपीएलच्या लिलावामध्येही मॅक्कलमवर कोणत्याही संघानं बोली लावलेली नाही.