महेंद्रसिंह धोनीला कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडणारं नक्की प्रकरण काय?
भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध असलेला महेंद्र सिंह धोनी याच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आलाय
मुंबई : भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध असलेला महेंद्र सिंह धोनी याच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आलाय. एसके एटरप्रायझेसचे मालक नीरज कुमार यांनी बेगुसराय न्यायालयात हा खटला दाखल केला आला असून धोनीसह 7 जणांना आरोपी करण्यात आलीय. त्यामुळे महेंद्र सिंह धोनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रकरण काय ?
बेगूसराय येथील एसके एटरप्रायझेस आणि न्यू ग्लोबल उपज वर्धक इंडिया लिमिटेडसोबत एक करार झाला होता. या करारानुसार ३० लाख रुपयांचे एक उत्पादन घेण्यात आले होते. कंपनीच्या वतीने एजन्सीकडे खत पाठविण्यात आले मात्र तेथून मार्केटिंगला सहकार्य करण्यात आले नाही. यानंतर एजन्सीचे मालक नीरजकुमार निराला यांनी कंपनीवर असहकाराचा आरोप केला.
याप्रकरणी तक्रार केल्यानंतर कंपनीने अडकलेल्या एजन्सीला परत घेऊन त्याबदल्यात 30 लाखांचा चेक दिला. त्यानंतर हा चेक बँकेत टाकला असता तो बाऊन्स झाला. याबाबत कंपनीला वारंवार माहिती देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे धनादेश बाऊन्स झाल्याबद्दल कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली, मात्र त्याचेही उत्तर न मिळाल्याने नाराज होऊन नीरज कुमार निराला न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.
नीरज कुमार यांनी कंपनीचे बिहारचे मार्केटिंग हेड अजय कुमार, सीईओ राजेश आर्या, कंपनीचा चेअरमन धोनीसह 7 जणांविरुद्ध आयपीसी कलम ४०६, १२० बी आणि एनआय अॅक्ट कलम १३८ नुसार बेगुसराय न्यायालयात खटला दाखल केलाय.मुख्य जिल्हान्यादंडाधिकारी रुपम कुमारी यांनी नीरज कुमार निराला यांची याचिका दाखल करून घेतली.
म्हणून धोनी अडकला गुन्ह्यात
सदर कंपनीच्या उत्पादनाची जाहिरात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केली होती. त्यामुळे नीरज कुमार निराला यांनी धोनीविरोधातही गुन्हाही दाखल केला आहे. यासोबतच कंपनीच्या सीईओसह सात जणांनाही आरोपी करण्यात आले आहे.या प्रकरणी कोर्टात २८ जून रोजी सुनावणी होणार आहे.