नवी दिल्ली : आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक खेळाडू आपली खास वैशिष्ट्ये बनवतात. ही वैशिष्ट्ये खास करून खेळातील कामगिरीशी संबंधीत असतात. पण, एक भारतीय खेळाडू मात्र याला अपवाद ठरला. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख मुशर्रफ यांच्यासह  तिथल्या असंख्य मुलींच्या हृदयावर या खेळाडूने अक्षरश: राज केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मीपती बालाजी असे या खेळाडूचे नाव आहे. लक्ष्मीपती बालाजी आज (२७ सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने जरी निवृत्ती घेतली असली तरी, आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे तो नेहमीच आठवणीत राहतो. लक्ष्मीपती बालाजीचे देशभरात फॅन्स होतेच. पण, पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ हे सुद्धा त्याचे फॅन होते. विशेष म्हणजे लक्ष्मीपतीच्या चाहत्या असलेल्या तरूणींमध्ये पाकिस्तानी तरूणांची संख्या अधिक होती.


बालाजीचा जन्म २७ सप्टेंबर १९८१चा. त्याने पाकिस्तानविरूद्ध खेळलेल्या ३ टेस्ट सामन्यांच्या मालिकेत १२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या विकेटमुळे भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. रावळपींडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरच्या चेंडूवर त्याने असा काही षटकार ठोकला की, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही त्याचे कौतूक केले. त्याचा षटकार पाहून 'तुझे स्ट्रोक जबरदस्त असतात' असे उद्गार सचिनने काढले होते. तर, तत्कालीन कोच जॉन राईटनेही बालाजीच्या फलंदाजीचे कौतूक करताना त्याला 'ब्लॅक ब्रॅडमन' असे म्हटले होते.


'मुझसे शादी करेंगे..'


एक काळ होता. लक्ष्मीपती बालाजी भारतीय संघाचा स्टार गोलंदाज तर, पाकिस्तानी तरूणींच्या गळ्यातला ताईत बनला होता. २००४ मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता. त्यावेळी लक्ष्मीपतीने भारतीय चाहत्यांसह पाकिस्तानी तरूणींचेही हृदय जिंकले होते. लक्ष्मीपती बालाजीसाठी पाकिस्तानी तरूणी इतक्या घायाळ झाल्या होत्या की, अनेकींनी आपल्या 'Will you marry me' हातावर असे लिहून बालाजीला प्रपोजही केले होते.