मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टीन बडोद्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे. २८ डिसेंबरला रस्ता अपघातामध्ये जेकब मार्टीन गंभीररित्या जखमी झाला होता. जेकब मार्टिनच्या फुफ्फुस आणि यकृताला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे सध्या तो व्हॅण्टिलेटरवर आहे. मार्टिनच्या उपचारासाठी जास्त पैशांची गरज असल्यामुळे त्याच्या पत्नीनं बीसीसीआयकडे मदतीची मागणी केली होती. यानंतर बीसीसीआयनं मार्टिनच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत केली. तर बडोदा क्रिकेट असोसिएशननंही मार्टिनच्या उपचारासाठी ३ लाख रुपये दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता भारताचा क्रिकेटपटू कृणाल पांड्याही मार्टिनच्या मदतीला धावला आहे. कृणाल पांड्यानं मार्टिनच्या मदतीसाठी ब्लँक चेक दिला आहे. हवे तेवढे पैसे घ्या, पण १ लाख रुपयांपेक्षा कमी पैसे घेऊ नका, असं कृणाल पांड्यानं हा चेक देताना मार्टिनच्या कुटुंबाला सांगितल्याचं वृत्त द टेलिग्राफनं दिलं आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनंही जेकब मार्टिनची मदत केली आहे.


बडोदा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव संजय पटेल हे मार्टिनच्या परिवाराला मदत करणारे पहिले व्यक्ती होते. पटेल यांनीच मार्टिनच्या कुटुंबाची सौरव गांगुलीसोबत भेट घडवून आणली होती. आणखी मदत पाहिजे असेल तर मला संपर्क करा, असं मी मार्टिनच्या पत्नीला सांगितल्याची प्रतिक्रिया सौरव गांगुलीनं दिली होती.


जेकब मार्टिननं १९९९ साली सौरव गांगुली कर्णधार असताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जेकब मार्टिन भारतासाठी १० एकदिवसीय सामने खेळला. तर १३८ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ४७ च्या सरासरीनं त्यानं ९,१९२ धावा केल्या. १७ ऑक्टोबर २००१ साली केनियाविरुद्ध पोर्ट एलिजाबेथमध्ये मार्टिन भारताकडून शेवटचा सामना खेळला.



मदतीची मागणी करावी का नाही, याबद्दल मार्टिन यांचं कुटुंब संभ्रमात होतं. पण आज त्यांना काहीही मागण्याची गरज नाही. क्रिकेटशी जोडल्या गेलेल्या अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे, असं संजय पटेल म्हणाले. तसंच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडूनही मदतीचं आश्वासन मिळालं असल्याचं पटेल यांनी सांगितलं. झहीर खान यानंही रविवारी फोन करून मदत करणार असल्याचं सांगितल्याचं वक्तव्य पटेल यांनी केलं. 


बीसीसीआयचे माजी आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय पटेल यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. जेकबच्या उपचाराबद्दल मला कळलं तेव्हा मी त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली. काही हितचिंतकांशी मी बोललो. बडोद्याचे महाराज समरजीतसिंग गायकवाड यांनी १ लाख रुपये देणगी दिली, तर ५ लाख रुपये गोळा केले, असं संजय पटेल म्हणाले.


एकावेळी रुग्णालयाचं बिल ११ लाख रुपयांच्या वर गेलं होतं. यामुळे रुग्णालयानंही औषधं देणं बंद केलं होतं. पण बीसीसीआयनं रुग्णालयाला थेट पैसे दिले आणि तेव्हापासून उपचार सुरु आहेत, अशी प्रतिक्रिया संजय पटेल यांनी दिली.


जेकब मार्टीन याच्या उपचारासाठी दिवसाला ७० हजार रुपयांचा खर्च आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशननं २.७० लाख रुपये (३० हजार रुपयांचा टीडीएस कापून) जेकबच्या उपचारासाठी दिले आहेत. पण बडोदा क्रिकेट असोसिएशन यापेक्षा जास्त मदत करेल, अशी अपेक्षा आहे. जेकब मार्टीनच्या नेतृत्वात बडोद्यानं रणजी ट्रॉफी जिंकली होती.