मुंबई : भारतीय क्रिकेट संघात दमदार कामगिरी करणारं आणि सातत्यानं प्रसिद्धीझोतात असणारं एक नाव म्हणजे महेंद्रसिंह धोनी. भारतीय क्रिकेट संघातून निवृत्ती घेतली असली तरीही माही आयपीएलमध्ये मात्र सक्रिय आहे. क्रिकेटव्यतिरिक्तही धोनी इतर क्षेत्रांमध्ये त्याची छाप सोडताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाहिराती असो किंवा मग मुलाखती, धोनी कॅमेऱ्यासमोरही अगदी सराईताप्रमाणे वावरतो. एखाद्या कलाकाराला ज्याप्रमाणे कॅमेराची सवय होऊन जाते, त्याचप्रमाणे धोनीलाही याची सवय झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्याची हीच कला पाहता येत्या काळात निर्मितीमध्ये उतरलेला धोनी अभिनय क्षेत्रातही सक्रिय होणार का, असाच प्रश्न अनेकांना पडला. 


मग काय, त्यानं स्वत:च याबाबतच्या प्रश्नांना उत्तरं देत चित्र अधिक स्पष्ट केलं. अभिनयाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा आपल्याला यामध्ये काहीच रस नसल्याचं त्यानं सांगितलं. एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, 'बॉलिवूड माझ्या अवाक्यातील गोष्ट नाही. जाहिरातींचं म्हणाल तर मी त्यातच आनंदी आहे. चित्रपटांबाबत सांगावं तर, हे अवघड क्षेत्र आहे आणि त्यामध्ये तग धरणं अतिशय कठीण. मी चित्रपट कलाकारांनाच यामध्ये अभिनय करायला सांगेन, कारण ते खरंच खूप चांगलं काम करत आहेत. मी क्रिकेटशी जोडलो गेलो आहे आणि जाहिरातींपर्यंतच अभिनय करु शकतो. याहून जास्त काही मला करता येत नाही.'


एमएसडी एंटरटेनमेंट (MSD Entertainment) या नावानं धोनीनं काही दिवसांपूर्वी निर्मिती संस्था सुरु केली होती. यामध्ये पत्नी साक्षी हिची त्याला साथ मिळत आहे. तूर्तास तो इथपर्यंतच समाधानी असून, पूर्णवेळ बॉलिवूडमध्ये येण्याची माहीची कोणतीही इच्छा नाही, हेच त्यानं स्पष्ट केलं आहे.