गंभीरने पॉटींगला झापलं! विराटबद्दलच्या `त्या` वक्तव्यावरुन म्हणाला, `भारतीय क्रिकेट...`
Gautam Gambhir Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर चषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने प्रसारमाध्यांशी संवाद साधताना नोंदवलं मत
Gautam Gambhir Border Gavaskar Trophy 2024: भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटींगला चांगलेच झापले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या सध्याच्या फॉर्मबद्दल पॉटींगने केलेल्या विधानावरुन गंभीर खवळल्याचं दिसून आलं आहे. गंभीरने खोचक प्रतिक्रिया नोंदवताना पॉटींगला तू भारतीय क्रिकेटमध्ये एवढा रस का घेत आहे असा प्रश्न विचारला आहे.
पॉटींगला झापलं
ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर गावसकर चषकातील 5 कसोटी सामने खेळण्यासाठी भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गंभीरने पॉटींगवर निशाणा साधला आहे. "पॉटींगला भारतीय क्रिकेटबद्दल काय देणंघेणं आहे? मला वाटतं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटबद्दल विचार करावा. मुळात विराट आणि रोहितबद्दल त्याला चिंता वाटण्याचं काही कारण नाही. मला वाटतं की ते फार उच्च दर्जाचे खेळू आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी बरंच काही केलं आहे. भविष्यातही ते दोघे भारतीय क्रिकेटमध्ये भरीव योगदान देतील," असा विश्वास गंभीरने व्यक्त केला आहे.
ही गोष्ट सर्वात महत्त्वाची
"मला असं वाटतं की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही ते स्वत:वर फार मेहनत घेत आहेत. ते अजूनही खेळाबद्दल फार पॅशनेट आहेत. त्यांना अजूनही धावांची भूक आहे. मला हे फार महत्त्वाचं वाटतं. या ड्रेसिंग रुममध्ये असलेली धावांची भूक मला अत्यंत महत्त्वाची वाटते. त्या ड्रेसिंग रुममधील प्रत्येक व्यक्तीसाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. मला वाटतं सर्वच खेळाडूंमध्ये कामगिरी करुन दाखवण्याची भूक दिसून येत आहे. खास करुन शेवटच्या मालिकेत जे काही घडलं त्यानंतर ही भूक अजून वाढली आहे," असं गंभीर पत्रकारांशी बोलताना म्हणाला.
नक्की वाचा >> रोहित शर्माची कर्णधारपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी? पाकिस्तान कनेक्शन समोर; 'त्या' फोटोने वाद
पॉटींग काय म्हणाला होता?
पॉटींगने विराट कोहलीवर टीका करताना, 'मागील पाच वर्षांमध्ये केवळ दोन शतक झळकावणारा कोणताही इतर खेळाडू संघात टिकून राहिला असता असं वाटतं नाही', असा टोला लगावला होता. मात्र पॉटींगने विराटवर अशी कठोर टीका केली असली तरी विराटचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड दमदार आहे. ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेल्या मागील 13 सामन्यांमध्ये विराट कोहलीने 1352 धावा केल्या असून त्याची धावांची सरासरी 54 इतकी राहिली आहे. विराटने एकूण 6 शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत. 2014-15 च्या दौऱ्यात विराटने 86.50 च्या सरासरीने 692 धावा केल्या. धोनीने अचानक कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असलेली ही पहिलीच कसोटी मालिका होती. त्यामुळे तो यंदाच्या पर्वात कशी कामगिरी करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.