`टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...`; Ex कॅप्टन स्पष्टच बोलला
Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु होणारी आगामी कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतानाच आता हे विधान समोर आल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे.
Border Gavaskar Trophy 2024: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगदरम्यान सुरु असलेल्या तू-तू मैं-मैं वर भाष्य केली आहे. आगामी बॉर्डर-गावसकर चषकाचा विचार केल्यास भारतीय प्रशिक्षकाने अशाप्रकारचे वादग्रस्त विधानं करणं संघाच्या दृष्टीने योग्य नसल्याचं म्हटलं आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 22 तारखेला पर्थ येथील मैदानात खेळवला जाणार आहे. पाँटिंगने विराट कोहलीबद्दल केलेल्या विधानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया रवाना होण्याच्या एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीरने दिलेल्या उत्तरावरुन वादाला तोंड फुटलं. मागील पाच वर्षांमध्ये विराटला चांगली कामगिरी करता आली नाही असं पाँटिंग म्हणाला होता. यावर गंभीरने, "पाँटिंगला भारतीय क्रिकेटशी काय देणं-घेणं आहे? त्याने ऑस्ट्रेलियाबद्दल बोललं पाहिजे," असं म्हटलं होतं.
पाँटिंगने दिलं स्पष्टीकरण
यानंतर पाँटिंगने स्पष्टीकरण देताना, कोहलीने उत्तम कामगिरी करावी अशीच आपली अपेक्षा असल्याचं म्हटलं. मात्र त्याने गौतम गंभीरचा यावेळी 'लवकर चिडणारा' असा उल्लेख केला. कर्णधार म्हणून टीम पेन भारताविरुद्धची मालिका ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये पराभूत झाला होता. त्यानेच पाँटिंग आणि गंभीर वादावर बोलताना गंभीरला तणावाखाली शांत राहता येत नाही असं म्हटलं आहे. "मला हे आवडत नाही," असं पेनने 'सेन टासीस'शी बोलताना म्हटलं. "मला नाही वाटत की हे चांगलं लक्षण आहे. कारण त्याला फार साधा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर तो चिडला," असंही पेनने म्हटलं.
त्याला अजूनही वाटतं की..
"मला वाटतं गंभीर अजूनही पाँटिंगकडे ज्याच्याविरुद्ध आपण मैदानात उतरुन खेळणार आहोत अशाप्रकारे खेळाडू म्हणून पाहतो, असं वाटतं. मात्र पाँटिंग आता कॉमेंट्री करतो. त्याला त्याची मतं नोंदवण्याचा पैसा मिळतो. त्याची मत अगदी अचूक असतात. विराटची घसरण होत आहे आणि ही चिंतेची बाब आहे. नक्कीच ही चिंतेची बाब आहे. मात्र माझ्यामते सध्या रोहित शर्माची फलंदाजी किंवा विराट कोहलीची कामगिरी ही चिंतेची बाब नाही. तर भारता समोरील सर्वात मोठं आव्हान त्यांच्या प्रशिक्षकाने तणावाखाली शांत राहण्याचं आहे," असंही पेनने म्हटलं आहे.
गंभीर संघासाठी योग्य निवड नाही
गंभीरच्या तुलनेत रवी शास्री अधिक उत्तम होते असंही पेनने म्हटलं आहे. "ते (भारतीय संघ) शेवटच्या दोन मालिका इथे जिंकला तेव्हा रवी शास्री प्रशिक्षकपदी होते. त्यांनी फार छान वातावरण निर्माण केलं होतं. संघ तेव्हा फार पॅशनेटली खेळला होता. खेळाडूंनी खेळाचा आनंद घेत खेळावं आणि जिंकावं असं स्वप्न त्यांनी संघाला विकलं. आता ते नव्या प्रशिक्षकाअंतर्गत खेळत आहेत. तो फार लवकर चिडणारा आहे. असं करु नये किंवा नाही याबद्दल मी बोलणार नाही. पण नक्कीच ही भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून योग्य निवड नाही," असं पेनने स्पष्टपणे सांगितलं.