Rohit Sharma Vs Mohammed Shami: भारतीय संघाला मोहम्मद शमीची कमतरता जाणवत आहे हे दुसऱ्या कसोटीनंतर अधिक प्राकर्षाने अधोरेखित झालं आहे. मात्र शमीसंदर्भातील भारतीय संघातील गोंधळ अभूतपूर्व आहे. मागील दोन महिन्यांपासून शमी भारतीय संघामध्ये पुनरागमन करेल अशी स्थिती आहे. खरं तर शमी हा भारतीय संघात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र तीन कसोटी मालिकांनंतरही शमीला केवळ स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळवलं जात असून तो सध्या पश्चिम बंगालच्या संघाकडून खेळतोय.


रोहित शमीबद्दल उघडपणे काही गोष्टी बोलला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद  शमीच्या पायावर या वर्षाच्या सुरुवातीला शस्त्रक्रीया झाल्याने तो काही महिने आराम करत होता. त्यामुळेच तो 2024 चं आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप मालिकेला मुकला. तो वर्ल्ड कप 2023 च्या फायनलनंतर पहिल्यांदा यंदाच्या वर्षी 13 नोव्हेंबर रोजी मैदानात उतरला. त्याने रणजी सामन्यात मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात सात विकेट्स घेतल्या. त्याने सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतही दमदार कामगिरी केली. मात्र आता रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित दुसऱ्या कसोटीनंतरही शमीबद्दल उघडपणे काही गोष्टी बोलला आहे.


...असं असतानाला त्याला इथे आणायचं नाहीये


भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 10 विकेट्सने गमावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कर्णधार रोहित शर्माला मोहम्मद शमीसंदर्भात काय अपडेट्स आहेत असं विचारण्यात आलं. त्यावर रोहितने, "संघाचे दरवाजे शमीसाठी उघडे आहेत," असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना, "आम्ही त्याच्यावर लक्ष ठेऊन आहोत. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत खेळताना त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. त्यामुळेच कसोटी संघात परतणं लांबलं आणि तो कसोटीत खेळू शकला नाही. आम्ही त्याच्याबद्दल फार जास्त काळजीपूर्वक निर्णय घेत आहोत. सूज आलेली असताना किंवा इतर समस्या असताना आम्हाला त्याला इथे आणायचं नाहीये," असं रोहित म्हणाला. 


रोहित काय म्हणाला?


"त्याच्याबद्दल आम्हाला 100 टक्क्यांहून अधिक खात्री असेल तरच आम्ही निर्णय घेऊ. कारण तो फार जास्त काळापासून क्रिकेटच्या मैदानातून दूर आहे. आम्हाला त्याच्यावर ताण टाकाचा नाहीये. त्याने इथे येऊन तणावाखाली संघासाठी खेळावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. ही काही प्रोफेशनल देखरेख नाही. त्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्यां टीममधील खेळाडूंना काय वाटतं यावरुन आम्ही काय तो निर्णय घेऊ. कारण तेच लोक त्याचे सगळे सामने पाहत असून 20 ओव्हरच्या सामन्यात चार ओव्हर टाकल्यानंतर श्रेत्ररक्षणही करावं लागतं. मात्र मी म्हणालो तसं त्याच्यासाठी संघाची दारं उघडी आहेत. त्याने कधीही यावं आणि खेळावं," असं रोहितने स्पष्ट केलं आहे.


वादाची ठिणगी


मात्र एकीकडे रोहित पत्रकारांसमोर असं बोलत असला तरी दुसरीकडे 'दैनिक जागरण'मधील वृत्तानुसार, रोहित आणि शमीमध्ये मोठा वाद सुरु आहे. मागील महिन्यामध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असताना या दोघांमध्ये वाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बंगळुरुमधील पहिल्या कसोटीआधी रोहित शर्माने केलेल्या दाव्यानुसार, शमी हा पूर्णपणे तंदरुस्त नव्हता. त्याच्या गुडघ्याला सूज आली आहे, असं रोहितचं म्हणणं होतं. मात्र त्यापूर्वीच शमीने त्याच्या पायाला सूज आल्याच्या बातम्या फेटाळू लावत आपल्याला कोणतीही नवी दुखापत झालेली नाही असं स्पष्ट केलेलं. आपण धडधाकट असून आपल्याला पुनरागमनाची प्रतिक्षा आहेत. आपण यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं शमीचं त्यावेळी म्हणणं होतं. मात्र हे या दोघांमधील वादाच्या हिमनगाचं टोक होतं. पहिल्या कसोटीमध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर रोहित आणि शमी भेटले होते. मात्र त्या दोघांमध्ये सुसंवाद झाला नाही, असा दावा करण्यात आला आहे.


नेमकं घडलं काय?


"शमी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होता तेव्हा तो पहिल्या कसोटीदरम्यान बंगळुरुमध्ये रोहितला भेटला. त्या भेटीमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली. कर्णधाराने शमीच्या दुखापतीबद्दल केलेलं वक्तव्य आणि त्याच्या त्यावेळीच्या आकडेवारीवरुन त्याचप्रमाणे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील उपलब्धतेबद्दल केलेली विधानं या वादासाठी कारणीभूत ठरली," असं 'जागरण'ने दिलेल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे. बंगळुरुमधील पहिल्या कसोटीच्या आधीच रोहितने, "तो (शमी) ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या मालिकेसाठी तंदरुस्त आहे की नाही याबद्दल आताच आम्ही बोलणं घाईचं होईल," असं मत नोंदवलं होतं. "त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. हे फार असामान्य आहे. तो अजून स्वत:वर काम करत असून लवकरच तो 100 टक्के तंदरुस्त होईल. मात्र त्याच्या पायाला सूज आल्याने त्याला झटका बसला असून त्याला आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे," असं रोहित शमीबद्दल म्हणाला होता. 


रोहित का पाहतोय वाट?


आता रोहितला शमी भारतीय संघामध्ये नको आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यानंतर हा प्रश्न अधिक प्राकर्षाने उपस्थित केला जात असून शमीबद्दल संघाचं धोरण स्पष्ट का नाही असाही प्रश्न विचारला जात आहे. शमीचं बॉर्डर गावसकर चषकासाठीचं किट आणि ऑस्ट्रेलियाचा व्हिसा तयार आहे. मात्र रोहितने वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. बंगलासाठी आणि सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतही दमदार कामगिरी केल्यावरही रोहितने वाट पाहण्याची भूमिका घेतली असून बीसीसआयनेही शमीला ऑस्ट्रेलियाला जाण्यास अध्याप सांगितलेल नाही. बीसीसीआय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या परवानगीची वाट पाहत आहे. 


ऑस्ट्रेलियाला गेला तरी...


शमी ऑस्ट्रेलियाला गेला तरी त्याला ब्रिस्बेनची कसोटी खेळता येणार नाही. त्याला गाबा आणि मेलबर्न कसोटीमधील एका आठवड्याच्या मोठ्या अंतरानंतर बॉक्सिंग डे कसोटीत खेळता येईल असं सांगितलं जात आहे.