भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी क्रिकेट हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत (Boxing Day Test) स्कॉट बोलंडच्या (Scott Boland) गोलंदाजीवर फ्लिक शॉट खेळताना ऋषभ पंत (Rishabh Pant) बाद झाल्यावर केलेल्या टीकेनंतर सुनील गावसकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ अडचणीत असताना निष्काळजी आणि अविचारी शॉट खेळून बाद झाल्यानंतर सुनील गावसकर यांनी डावखुऱ्या फलंदाजावर जोरदार टीका केली होती. गावसकर यांनी या शॉटला “मूर्ख” म्हटले आणि पंतने ड्रेसिंग रुमच्या आत जाण्याची तसदी घेऊ नये अशा शब्दांत सुनावलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील गावसकर यांनी ऋषभ पंतवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओला 8.5 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यू मिळाले होते. मेलबर्न कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी समालोचन करताना सुनील गावसकर यांनी आपण ऋषभ पंतवर या पातळीवर जाऊन टीका का केली याचं कारण सांगितलं आहे. 


"प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, या खेळाने मला घडवलं आहे. भारतीय क्रिकेटने मला घडवलं आहे. त्यामुळे जेव्हा मी ऋषभ पंतसारख्या प्रतिभावान व्यक्तीला तो शॉट खेळताना पाहतो.... आणि त्याने खेळलेल्या पहिल्या शॉटमध्ये मला कोणतीही अडचण वाटली नाही. मी नाराज होण्याचं कारण म्हणजे पुढच्या चेंडूवर त्याच्या अहंकाराने वर्चस्व गाजवलं. मी नुकताच मिड्रिफमध्ये सेम शॉट खेळला आहे. मी गोलंदाजाला कोण बॉस आहे हे दाखवून देणार. कसोटी क्रिकेट हे सोपं नाही," असं गावसकर म्हणाले.



चांगले शॉट खेळण्याची गरज


तिसऱ्या दिवशी संघाची जी स्थिती होती ते पाहता ऋषभ पंतला संघाला चागल्या खेळाची गरज आहे याची जाण हवी होती. तो फक्त 28 धावांवर बाद झाला असंही ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की, "जेव्हा तो बाद झाला तेव्हा मी सतत होतो की, त्यांनी डीपला दोन क्षेत्ररक्षक ठेवले आहेत. हे मोठं मैदान असल्याने षटकार मारणं सोपं नाही. कॅच येतील अशा ठिकाणी क्षेत्ररक्षक उभे करण्यात आले आहेत. डीप स्क्वेअर आणि डीप फाईनला होता. पण त्याने थर्ड मॅनकडे झेल दिला".


भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाजाने पुढे सांगितलं की, ऋषभ पंत अनोख्या पद्धतीने खेळण्यास आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यास सक्षम आहे. “मी त्याला काही शानदार खेळी खेळताना पाहिलं आहे. पण इथे ऑस्ट्रेलियात त्याला असं वाटत आहे की, धावा करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. तो खेळपट्टीवरून खाली उतरत आहे आणि चेंडू उचलत आहे आणि चौकार मिळवत आहे”.


"परंतु भूतकाळात त्याने नेहमी अशा प्रकारे धावा केल्या असं नाही. त्याने अर्थातच ते शॉट्स खेळले आहेत आणि ते खूप चांगले आहेत. मी त्याला कव्हर ड्राइव्ह खेळताना पाहिले आहे. तो स्क्वेअर कट, पूल शॉट चांगले खेळतो," असंही त्यांनी सांगितलं. 


पुढे ते म्हणाले की, "जर चेंडू बॅटशी कनेक्ट झाला असता आणि षटकार गेला असता तर मी कौतुकही केलं असतं. पण तू बाद झालास. काळजी नसणं आणि निष्काळजी असणं यातील हा फरक आहे. मला वाटतं त्याने ती रेषा ओलांडली". दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 330 धावांची आघाडी घेतली आहेत.