Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेमध्ये एकूण पाच कसोटी सामने खेळणार असून भारतीय संघाने पर्थमधील कसोटी जिंकली आहे. या कसोटीमध्ये भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे. या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. दोन्ही संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना शुक्रवारी, 6 डिसेंबरपासून सुरु होत आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र रंगणारा हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. मात्र दुसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक गुड न्यूज आहे. भारतीय संघाचा आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे. 


भारतासाठी दुग्ध-शर्करा योग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका सुरु असतानाच दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळेच भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा मार्ग थोडा सुखकर झाला आहे. मात्र या पराभवाबरोबर समोर आलेल्या एका नव्या अपडेटमुळे भारतासाठी दुग्ध-शर्करा योगच जुळून आल्याचं चित्र दिसत आहे. 


दोन संघांना दंड


क्राइस्टर्च कसोटीमध्ये षटकांची गती नियंत्रणात न ठेवल्याने म्हणजेच स्लो-ओव्हर रेटमुळे आयसीसीने इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांच्या सामन्याच्या मानधनात 15 टक्के कपात केली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइण्ट्स टेबलमधील या दोन्ही संघाचे प्रत्येकी 3 गुण वजा करण्यात आले आहेत. याचा भारताला मोठा फायदा झाला आहे. 


आता एवढं केलं तरी भारत फायनल खेळणार


पर्थ कसोटी सुरु झाली तेव्हा भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 4-0 ने जिंकणं आवश्यक होतं. मात्र आता नव्या घडामोडीनंतर भारताला ही मालिका 3-0 अशी जिंकली तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठता येणार आहे. म्हणजेच भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सलग तिसरा अंतिम सामना खेळण्यासाठी उरलेल्या 4 पैकी केवळ 2 कसोटी सामने जिंकायचे आहेत.


सध्या पॉइण्ट्स टेबलची स्थिती काय?


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये भारत सध्या पहिल्या स्थानी आहे. भारताने 15 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले आहे. पाच पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासही भारताचे एकूण 110 पॉइण्ट्स आहेत. तर टक्केवारीचा विचार केल्यास भारताची टक्केवारी 61.11 टक्के आहे. भारताला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा विचार केल्यास अजून चार कसोटी खेळायच्या आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. या संघाने 9 सामन्यांपैकी 5 जिंकले असून 3 मध्ये पराभवाचं तोंड पाहिलं आहे. ऑस्ट्रेलियाचा एक सामना अनिर्णित राहिला असून त्यांचे एकूण पॉइण्ट्स 64 इतके आहेत. त्यांची टक्केवारी 59.26 आहे. तिसऱ्या स्थानी 13 सामन्यांमध्ये 57.69 टक्के विजयी सरासरी कायम ठेवली आहे. चौथ्या स्थानी श्रीलंका आणि पाचव्या स्थानी न्यूझीलंडचा संघ आहे. सहाव्या स्थानी इंग्लंड, सातव्या स्थानी पाकिस्तान आणि आठव्या क्रमाकांवर वेस्ट इंडिजचा संघ आहे. नवव्या स्थानी बांगलादेशचा संघ आहे.



इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.